नवी दिल्ली : समाजाच्या, देशाच्या विकासात द्रष्टेपणा असला पाहिजे. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अनेक असतात. मात्र प्रवाहाविरुद्ध चालणारे जिवंत असतात. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनात लोकाभिमुखता हा महत्वाचा गुण आहे. सामाजिक जाणिव आणि संवेदनशीलपणा ठेवून त्यांनी काम केले, माजी परराष्ट्र मंत्री, दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनीही ज्ञानेश्वर मुळे यांचे कौतुक केल्याचे नितीन गडकरी म्हणाले. राजधानी दिल्लीत ९८ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने पहिला चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार माजी परराष्ट्र सचिव आणि साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल एन. एन. व्होरा होते.
नितीन गडकरी म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज पहिला कार्यक्रम होत आहे. त्यात पहिला पुरस्कार एका कर्तबगार मराठी अधिकाऱ्याला, साहित्यिकाला मिळतो, याचा अभिमान आहे. कोल्हापुरात जन्माला आलेल्या मुळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले, असे गौरवोद्गारही नितीन गडकरी यांनी ज्ञानेश्वर मुळे यांच्याबद्दल काढले.
एक उदाहरण देत नितीन गडकरी म्हणाले की, निवृत्त तेव्हा व्हावे जेव्हा लोकांना वाटते की आपण निवृत्त होऊ नये, आपण कधी एकदा निवृत्त होतो असे कोणाला वाटू नये. नितीन गडकरींच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली. एन. एन. व्होरा म्हणाले की, मी सरहदचे काम १० वर्ष पाहिले आहे, त्यांनी चांगल्या संकल्पनासंह उत्तम काम केले. तसेच अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प गडकरींनी मार्गी लावले, असेही ते म्हणाले. यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात एक छोट्याशा गावात जन्माला आलेल्या व्यक्तीचा सत्कार होत आहे. चिंतामणराव देशमुख यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या नावाने हा पुरस्कार मिळतो, ही गौरवाची गोष्ट आहे. ते माझे आदर्श आहेत. जगाच्या पाठीवर अनेक देशात काम करण्याची संधी मिळाली. कुठलेही काम टीमवर्कने होते, आयुष्यात ते करण्याचा प्रयत्न केला. यापुढील आयुष्य चांगुलपणाच्या चळवळीसाठी द्यायचे आहे, असेही मुळे म्हणाले.
ज्ञानेश्वर मुळे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे जपान, रशिया, सिरिया, मालदीव, अमेरिका येथे राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. जगभरातील राष्ट्र प्रमुखांशी व्यक्तिगत संपर्क आलेले मुळे यांनी मराठी तरूणांनी भारतीय प्रशासकीय सेवेते यावे, यासाठी 'पुढचे पाऊल' तसेच चांगूलपणाची चळवळ यासाठी समर्पित केला आहे. दिल्लीतील मराठी अस्मितेसाठी त्यांनी केलेल्या अनन्यसाधारण कामगिरीची गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र व ५१ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.