नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी दोन दिवशीय पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. जयशंकर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या शांघाय परिषदेत भारताचे नेतृत्व करतील. जयशंकर यांनी पाकिस्तानला जाण्यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. माझा दौरा बहुपक्षीय कार्यक्रमासाठी आहे. मी तिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर चर्चेसाठी जात नसल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित सरदार पटेल व्याख्यानमालेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना एस जयशंकर यांनी जगभरात सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मध्यपूर्वेतील परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे, या परिस्थितीचा आपल्या देशावरही परिणाम होईल. युक्रेन, मध्यपूर्व किंवा पश्चिम आशियामधील संघर्षाचा भारतावर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. सध्या रशिया-युक्रेन, इराण-लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हा संघर्ष अस्थिरतेला कारणीभूत ठरतो. यामुळे भारतासह संपूर्ण जग काळजी करत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, इस्लामाबादमध्ये शांघाय परिषदेचे आयोजन पाकिस्तान करत आहे. या बैठकीला परराष्ट्रमंत्री जयशंकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली होती.