

The price of gold could reach 3 lakhs by 2029
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२०२९ पर्यंत भारतातील सोन्याचा प्रतितोळा भाव ३ लाखांवर जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ आणि दिग्गज मार्केट रणनीतीकार एड यार्डेनी यांनी व्यक्त केले. सोन्यातील तेजीमुळे डॉलरचे विनिमय मूल्य घसरेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोने दराबाबत यार्डेनी हा अंदाज वर्तविला आहे. सोन्याचे दर या दशकाच्या शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढू शकतील, असा अंदाज यार्डेनी यांनी वर्तवला आहे. २०२९ पर्यंत सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात १० हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्क येथील कॉमेक्सवर सोन्याचा दर ४४०० डॉलर प्रति औंस इतका आहे. २२ डिसेंबरला सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले होते. या तेजीमागील कारण अमेरिकन फेडरल रिझव्र्हकडून आगामी काळातील व्याज दर कपातीची अपेक्षा आहे. सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. डॉलर कमजोर होणं हा देखील सोने दरवाढी मागील फॅक्टर मानला जात आहे. २०२५ मध्ये सोन्याचे दर ६७ टक्क्यांनी वाढले आहेत.
आगामी काळात १२७ टक्क्यांची तेज
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ४४१० डॉलर प्रतिऔंस आहे. सोन्याचे दर या दशकाच्या शेवटपर्यंत १०००० डॉलर प्रतिऔंसवर गेल्यास सोने दरातील तेजी १२७ टक्के असू शकते. म्हणजेच सोन्याचे दर अडीच पट वाढू शकतात. भारतीय बाजाराचा विचार केल्यास एमसीएक्सवर सोन्याचा दर १३५८९० रुपये आहेत. २०२९ पर्यंत यात १२७ टक्क्यांची तेजी आल्यास दर ३.०८ लाख रुपये असेल, असे यार्डेनी यांनी म्हटले आहे.