

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीहून मुंबईकडे झेपावलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाले. ही बाब लक्षात येताच वैमानिकांनी प्रसंगावधान राखत दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे यशस्वी आपत्कालीन लँडिंग केले. या विमानात 335 प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य होते. तेे सर्व सुरक्षित आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या एआयसी 887 (बोईंग 777-300 ईआर) या विमानाने पहाटे 3.20 ऐवजी सकाळी 6.30च्या सुमारास दिल्लीहून मुंबईसाठी उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच वैमानिकांच्या लक्षात आले की, विमानातील इंजिन क्रमांक 2 (उजव्या बाजूचे इंजिन)मधील तेलाचा दाब (ऑईल प्रेशर) झपाट्याने कमी होत आहे. काही मिनिटांतच हा दाब शून्यावर पोहोचला. वैमानिकांनी तातडीने मानक कार्यपद्धती अवलंबली आणि बिघाड झालेले इंजिन बंद केले. विमानाचे उड्डाण होऊन सुमारे एक तास झाला होता. परंतु धोका ओळखून विमानाचा मार्ग बदलून पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आले. दिल्ली विमानतळावर सकाळी 6.40 ते 6.52 या दरम्यान आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली होती.
विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी दिल्ली विमानतळावरील इतर सर्व विमानांची उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली होती. विमानाला प्राधान्याने उतरण्यासाठी धावपट्टी मोकळी करून देण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून धावपट्टीजवळ रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या.
चौकशीचे आदेश
या गंभीर घटनेची दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतली आहे. एअर इंडियाचे कायमस्वरूपी तपास मंडळ एअर सेफ्टी संचालकांच्या देखरेखीखाली या तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी करणार आहे. एअर इंडियाने प्रवाशांची पर्यायी व्यवस्था केली असून विमानाची तांत्रिक तपासणी सुरू आहे.