

पुढारी ऑनलाईन डेस्क: European Union | जगभरात सुरू असलेल्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर, युरोपियन महासंघाच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन संपूर्ण युरोपियन युनियन सरकारसोबत (कॉलेज ऑफ कमिशनर्स) भारत दौऱ्यावर आज (दि.२७) पोहचल्या आहेत. त्यांनी दिल्लीतील इंडिया गेटचा फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करत भारत दौऱ्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी भारताला संघर्षाच्या काळातील विश्वासू मित्र देखील म्हटले आहे.
युरोपियन महासंघाच्या अध्यक्षा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या आयुक्तांच्या टीमसोबत मी दिल्लीत पोहचले आहे. सध्याच्या संघर्ष आणि तीव्र स्पर्धेच्या युगात तुम्हाला विश्वासू मित्रांची आवश्यकत आहे. त्यामुळे युरोपीयन महासंघासाठी भारत हा एक मित्र आणि धोरणात्मक सहयोगी असल्याचे उर्सुला यांनी म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी पुढील स्तरावर कशी नेता येईल यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
भारत आणि युरोपियन महासंघ (EU) यांच्यातील संबंधांसाठी ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे. उर्सुला यांच्या भारत भेटीदरम्यान मुक्त व्यापार करार, युरोपीयन युनियन-भारत व्यापार यासह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारत दौऱ्यावर आलेल्या उर्सुला यांच्या भेटीचा अजेंडा म्हणजे मुक्त व्यापार करारासह इतर मुद्दे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या आयोगाच्या नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीला त्यांचा हा दौरा आहे. या दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि उर्सुला एका पूर्ण सत्राचे सह-अध्यक्षत्व करतील आणि दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. भारत आणि युरोपियन महासंघाने जून २०२२ मध्ये व्यापार करारासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या आहेत.