

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली. ६ वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये भीषण हल्ला घडवून आणला होता. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही या हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
सोशल मीडिया एक्सवर व्यक्त होत पंतप्रधान म्हणाले की, '२०१९ मध्ये पुलवामा येथे आपण गमावलेल्या धाडसी वीरांना श्रद्धांजली. येणाऱ्या पिढ्या त्यांचे बलिदान आणि राष्ट्राप्रती त्यांचे अढळ समर्पण कधीही विसरणार नाहीत.' तर '२०१९ मध्ये आजच्याच दिवशी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना मी कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
दहशतवाद हा संपूर्ण मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि संपूर्ण जग त्याच्या विरोधात एक झाले आहे. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा एअर स्ट्राईक, मोदी सरकार दहशतवाद्यांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवून त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्याचा दृढनिश्चय करत आहे.' अशा भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केल्या. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनीही पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन केले. ते म्हणाले की, 'पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शूर सैनिकांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करतो. भारत त्यांचे सर्वोच्च बलिदान कधीही विसरणार नाही.'