

पुढारी ऑनलाईन डेस्क: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस, ज्येष्ठ राष्ट्रीय नेते सीताराम येचुरी यांचे आज ( दि.१२) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्ण्लयात दीर्घ आजारानंतर वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. येचुरी यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम जपत देहदान केल्याचे समजते.
सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी (वय ७२) यांचे आज दुपारी ३.०५ वाजता निधन झाले. कुटुंबाने त्यांचा पार्थिव नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) येथे शिक्षण आणि संशोधनासाठी दान केल्याची माहिती एम्स रुग्णालयाने दिल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांना न्यूमोनियासारखा आजाराने छातीत संसर्ग झाला होता. तसेच श्वास घेण्यासही त्रास झाल्याने त्यांना १९ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज वयाच्या ७२ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.