Lok Sabha Election 2024,
Lok Sabha Election 2024,

निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी केली जाहीर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (दि.२५ मे) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली. देशातील पहिल्या पाच देशातील प्रत्येक मतदारसंघात एकूण किती मतदार आहेत?, त्यापैकी किती मतदान झाले?, मतदानाची टक्केवारी किती? अशा स्वरूपात आयोगाने आकडेवारी जाहीर केली.

देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान झाले. याच दिवशी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये ६५.९८ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रामध्ये ६१.४६ टक्के मतदान झाले.

निवडणूक आयोगाने बुथनिहाय मतदानाची टक्केवारी संकेतस्थळावर प्रकाशित करावी. ही टक्केवारी प्रकाशित करत असताना विलंब न करता ४८ तासांत उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना, आयोगाला यासंबंधी कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. असे सांगून याचिका तहकूब केली होती. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा विषय देशभरात चांगलाच चर्चेचा ठरला होता. त्यानंतर आता आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली. परंतू, यामध्ये बुथनिहाय आकडेवारी जाहीर न करता लोकसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी आयोगाने जाहीर केली.

दरम्यान, निवडणूक आयोगावर आकडेवारीवरून केल्या गेल्या आरोपावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले. "मतदानाच्या आकडेवारी वरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे आम्हाला माहित आहे. हा कसला खेळ आहे, हे नक्कीच आम्ही समोर आणू. लोकांची कशा पध्दतीने दिशाभूल सुरु आहे, ते चव्हाट्यावर आणले जाईल, " असा पलटवार त्यांनी केला.

पहिल्या पाच टप्प्यांमध्ये आयोगाने जाहीर केलेली महाराष्ट्रातील आकडेवारी

  • 64.2 टक्के- पहिला टप्पा
  • 62.75टक्के – दुसरा टप्पा
  • 63.34 टक्के – तिसरा टप्पा
  • 62.62 टक्के- चौथा टप्पा
  • 56.74 टक्के – पाचवा टप्पा
logo
Pudhari News
pudhari.news