

नवी दिल्ली : ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांमध्ये असंतोष आहे. त्यांचे खासदार, आमदार आमच्या संपर्कात आहेत. आम्ही लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण करू, असे वक्तव्य केंद्रीय आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार फुटणार या चर्चांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, ऑपरेशन टायगर हे सुरूच आहे. दररोज शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांमध्ये असंतोष आहे. आम्ही लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण करू. बाळासाहेब ठाकरेंना हिंदुत्ववादी नेता म्हणून जगाने मान्यता दिली होती. मात्र आज ठाकरे गटाने १०० टक्के हिंदुत्व सोडले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाच्या चर्चेवर बोलताना तो त्यांचा घरगुती विषय आहे. मात्र ज्यांच्यामुळे राज ठाकरे बाहेर पडले ते लोक टाळी देण्याची भाषा करत आहेत, असेही ते म्हणाले.
योगा दिनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, यंदा आपण ११ वा योगा दिन साजरा करत आहोत. आमच्या विभागाद्वारे जोरदार तयारी केली जात आहे. पंतप्रधान यंदा योगादिनाच्या कार्यक्रमाला विशाखापट्टणम येथे जाणार आहेत. या ठिकाणी ५ लाख लोक योगासाठी येणार आहेत, अशी आमची तयारी आहे. लोकांनी योगा दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनाचे काही ठिकाणी रुग्ण आढळत आहेत. काही ठिकाणी वाढ देखील होते आहे,. मात्र ती खूप जास्त नाही. गुरूवारी याबाबत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी बैठक घेतली. याबाबत सगळ्या राज्यांना तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी घाबरु नये मात्र काळजी घेतली पाहिजे. लोकांनी आता मास्क वापरणे सुरू करायला हवे, असेही ते म्हणाले.