

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पारंपरिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असल्याने दहशतवादी संघटनांनी संवादाच्या नव्या पद्धती शोधल्या आहेत. दहशतवादी गट आणि त्यांचे परदेशी हँडलर्स नव्याने भरती झालेल्या तरुणांशी संपर्क साधण्यासाठी आता पोर्न साईटस् आणि कूटबद्ध ॲप्लिकेशन्सचा वापर करत असल्याचा धक्कादायक खुलासा सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर उघडकीस आल्यानंतर हा नवा प्रकार समोर आला आहे.
पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'चा कट
पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय' आणि दहशतवादी गट संशयास्पद डिजिटल प्लॅटफॉर्मवरील दुर्लक्षित फीचर्सचा गैरवापर करत आहेत. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी आणि ओव्हरग्राऊंड वर्कर यांना सूचना देण्यासाठी या पद्धतींचा वापर केला जात आहे. अनेक अश्लील संकेतस्थळांवर स्थानिक वापरकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी रिअल-टाइम चॅट किंवा डेटिंग फीचर्स असतात. हे फीचर्स यंत्रणांच्या पाळतीखाली सहज येत नसल्याने हँडलर्स तिथून कारवायांचे समन्वय साधत आहेत. भारतात अशा साइट्सवर बंदी असल्याने व्हीपीएनच्या माध्यमातून ती उघडली जात आहेत.
'टॉर' (Tor) नेटवर्क, एनक्रिप्टेड ॲप्सचा विळखा
दहशतवादी 'द अनियन राऊटर' नेटवर्कवर आधारित कोअटेक्स आणि कॉनियन यांसारख्या ॲप्सचाही वापर करत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघड झाले आहे. या तंत्रज्ञानामध्ये माहितीचे आदानप्रदान कांद्याच्या थरांप्रमाणे एनक्रिप्शनच्या अनेक स्तरांमधून होते. डेटा वेगवेगळ्या स्वयंसेवी रिले नोड्समधून फिरवला जात असल्याने संदेश पाठवणारा आणि स्वीकारणारा यांचा अचूक आयपी ॲड्रेस किंवा स्थान शोधणे अत्यंत कठीण ठरते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ॲप्लिकेशन्स रडारवर
सिम कार्ड किंवा फोन नंबरशिवाय एंड टू एंड एनक्रिप्टेड मेसेजिंग सुविधा देणारे फ्रान्समधील ॲप, व्हिएतनाममधील काही गोपनीय प्लॅटफॉर्म्स आणि चीनी संशयास्पद पार्श्वभूमी असलेले 'मूनचॅट'हे पीजीपी एनक्रिप्टेड ॲप सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत. हे ॲप्लिकेशन्स धीम्या २ जी किंवा एज नेटवर्कवरही सहज काम करतात, ज्यामुळे खोऱ्यातील दुर्गम भागातही संवाद राखणे दहशतवाद्यांना शक्य होते.
सुरक्षा यंत्रणांची वाढती सतर्कता
मूळतः गोपनीयतेसाठी वापरले जाणारे टॉर नेटवर्क आता देशविरोधी कारवायांचे केंद्र बनत आहे. दहशतवादी संघटना पारंपरिक सोशल मीडिया सोडून या अत्याधुनिक ऑफ-ग्रिड माध्यमांकडे वळल्या असल्या तरी भारतीय सायबर यंत्रणांनी या प्रणालींमध्ये हस्तक्षेप करून कट उधळण्यासाठी आपली डिजिटल पाळत अधिक सक्षम केली आहे.