

Tahwwur Rana
नवी दिल्ली: दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला त्यांच्या कुटुंबीयांशी फोनवरुन एकदा बोलण्याची परवानगी सोमवारी दिली. विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी राणाला ही परवानगी दिली. फोनवरील संवाद तुरुंग नियमावलीनुसार आणि तिहार तुरुंग अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असेल, असे न्यायाधीशांनी सांगितले.
न्यायालयाने सोमवारपासून १० दिवसांच्या आत दहशतवादी राणाच्या प्रकृतीबाबत नवीन अहवाल मागितला आहे. राणाला नियमित फोन कॉल करण्याची परवानगी द्यावी की नाही यावर तुरुंग अधिकाऱ्यांकडून त्यांची भूमिका स्पष्ट करणारा अहवालही न्यायाधीशांनी सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, दहशतवादी तहव्वूर राणा सध्या तिहार तुरुंगात आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, २४ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी तहव्वूर राणाची नातेवाईकांशी फोनवरुन बोलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. एनआयएने त्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा अर्ज सादर केल्यानंतर आता परवानगी मिळाली आहे.