राज्यसभेच्या दहा रिक्त जागा भाजपच्या झोळीत जाणार?

राज्यसभेच्या दहा रिक्त जागा भाजपच्या झोळीत जाणार?

[author title="उमेश कुमार" image="http://"][/author]

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक लढणारे राज्यसभेतील १० खासदार निवडून आल्यामुळे राज्यसभेच्या दहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, आसाम, बिहारमधील प्रत्येकी २, तर हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. राज्यसभा सचिवालयाने याबाबतची अधिकृत माहिती दिली.

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या या जागांवर ७ ठिकाणी भाजपचे सदस्य तर २ जागांवर काँग्रेसचे सदस्य आहेत. राष्ट्रीय जनता दलाचाही एक सदस्य आहे. मात्र, भाजपचे संख्याबळ लक्षात घेता, या सर्व जागा भाजपच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयुष गोयल आणि सातारा येथून उदयनराजे भोसले भाजपच्या तिकीटावर निवडून आल्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. याशिवाय मध्यप्रदेशातील गुणा लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव, आसाममधील खासदार कामाख्याप्रसाद तासा, सर्वानंद सोनोवाल हे सुद्धा लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. सर्बानंद सोनोवाल यांची नव्या सरकारमध्ये बंदरे व जलवाहतूक मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

राजस्थानमधील काॅंग्रेसचे राज्यसभा सदस्य के. सी. वेणूगोपाल केरळच्या आलप्पुुझा मतदारसंघात विजयी झाले आहेत. बिहारच्या पाटलीपूत्र मतदारसंघातून राजदच्या तिकीटावर निवडून आलेल्या मीसा भारती राज्यसभा सदस्य आहेत.भाजपचे राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर यांनी बिहारच्या बांकीपूरमधून विजयी झाले आहेत. हरियाणाचे काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुडा रोहतकमधून निवडून आले आहेत. त्यांचीही जागा रिक्त झाली आहे.

अजित पवार गटाची दोन जागांवर नजर

रालोआ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची महाराष्ट्रात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या दोन्ही जागांवर नजर आहे. या दोन्ही जागा आमच्या गटाला मिळतील, असे अजित पवार यांनी आधीच जाहीर केले आहे. राज्यसभेवर आमचे दोन खासदार निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रफुल्ल पटेल यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार गटाने केंद्रीय राज्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news