

पुढारी ऑनलाईन डेस्क : SLBC Tunnel Collapse | तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम डाव्या किनारा कालवा प्रकल्पाच्या बोगद्याचा एक भाग कोसळल्यानंतर आत अडकलेल्या आठ लोकांना बाहेर काढण्यासाठी सावधगिरीने बचाव कार्य सुरू आहे. शनिवारी सकाळी ८:३० वाजता हा अपघात झाला. आतापर्यंत बचाव कर्मचारी बोगद्याच्या आत १३ किलोमीटर पर्यंत पोहोचले आहेत. बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बचाव पथके कामगार अडकलेल्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी झाली आहेत. त्यांना चिखलात अडकलेल्या एका कामगाराचा हात सापडला आहे. यामुळे अधिक सावधगिरीने बचावकार्य सुरू आहे. पथके बोगद्याच्या आतील मातीचे ढिगारे आणि काँक्रीटचे ढिगारे काळजीपूर्वक काढून टाकत आहेत. अपघात क्षेत्रातून पाणी काढून टाकण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अडकलेल्या आठ कामगारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना चिखलाच्या ढिगाऱ्यांमुळे मोठा अडथळा येत आहे.
बोगद्यातील लोखंड, मोडतोड आणि सिमेंटचे तुकडे काढण्याचे काम सुरू आहे.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि कंपनीचे कर्मचारी बचाव कार्यात सहभागी आहेत.
शनिवारी ज्या ठिकाणी टनेल बोअरिंग मशीन होती त्या ठिकाणी बचाव पथके पोहोचली आहेत.
बचाव पथक वेगाने काम करत आहे आणि लवकरच अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची अपेक्षा आहे.
शनिवारी सकाळी बोगद्यात ५० लोक काम करत होते. जेव्हा ते १३.५ किमी आत पोहोचले तेव्हा अचानक छप्पर कोसळले.
४२ कामगार कसेतरी बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
८ लोक (२ अभियंते आणि ६ कामगार) आत अडकले आहेत.
६ जण जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे कर्मचारी आहेत आणि २ जण अमेरिकन कंपनीचे कर्मचारी आहेत.
हा बोगदा ४४ किमी लांबीचा बांधला जात आहे, जो श्रीशैलम प्रकल्पातून पाणी वाहून नेईल आणि नालगोंडा जिल्ह्यातील ४ लाख एकर जमिनीला सिंचन देईल.
आतापर्यंत ३४.५ किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर ९.५ किमीचे काम बाकी आहे.