

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांनी पुन्हा एकदा आपल्या बंडखोर वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांनी थेट इशारा दिला असून, आपली भूमिका आता कोणताही पक्ष किंवा कुटुंब नव्हे, तर जनता आणि सर्वोच्च न्यायालय ठरवेल असे म्हटले आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे राजदच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हे आहेत.
तेज प्रताप यादव यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या शांत राहण्याला माझा कमकुवतपणा समजण्याची चूक करणाऱ्यांनो, मला तुमच्या षडयंत्रांची कल्पना नाही असे समजू नका. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करेन. खोटेपणा आणि फसवणुकीने रचलेला हा चक्रव्यूह मी भेदण्यासाठी सज्ज आहे. सत्य समोर येण्यासाठी तयार राहा. माझी भूमिका माझी प्रिय जनता आणि माननीय सर्वोच्च न्यायालय निश्चित करेल, कोणताही पक्ष किंवा कुटुंब नाही...’ त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या असून, याचा थेट रोख कोणाकडे आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी, माजी मंत्री आणि राजदचे आमदार तेज प्रताप यादव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यामध्ये तेज प्रताप यादव यांचे अनुष्का नावाच्या एका तरुणीसोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर, ते दोघे एकमेकांना तब्बल 12 वर्षांपासून ओळखत असल्याचेही त्या पोस्टमध्ये म्हटले गेले होते. या पोस्टमुळे मोठे वादळ निर्माण झाले होते, ज्याची परिणती म्हणून लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. तसेच, त्यांना कुटुंबातूनही बेदखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘खाजगी जीवनातील नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष करणे, हे आपल्या सामाजिक न्यायासाठीच्या सामूहिक संघर्षाला दुर्बळ बनवते. ज्येष्ठ पुत्राची सार्वजनिक वर्तणूक तसेच बेजबाबदार वागणूक आमच्या कौटुंबिक मूल्यांशी आणि संस्कारांशी सुसंगत नाहीत. म्हणूनच, अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मी त्याची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी करत आहे. यापुढे पक्ष आणि कुटुंबामध्ये त्याची कोणत्याही प्रकारची भूमिका असणार नाही. त्याचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात येत आहे.’
तेज प्रताप यादव यांच्या ताज्या वक्तव्यामुळे यादव कुटुंबातील आणि राजद पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. आगामी काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते आणि तेज प्रताप यादव नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.