तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १६ कामगारांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी व्यक्त केला शोक
तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १६ कामगारांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Published on
Updated on

विरुधुनगर : तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात एका फटाका निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, अनेक कामगार अद्यापही मलब्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा भीषण स्फोट कट्टनारपट्टी भागातील एका फटाका युनिटमध्ये झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, आगीने काही वेळातच शेजारील चार युनिट्सना आपल्या कचाट्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्फोटाच्या धक्क्याने परिसरातील इमारतींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती निवारण पथके घटनास्थळी दाखल झाली असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला असून सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, फटाके तयार करताना सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून बचावकार्य वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी व्यक्त केला शोक

या हृदयद्रावक घटनेवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनापट्टी येथील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो."

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, त्यांनी मंत्री के. के. एस. एस. आर. रामचंद्रन आणि थंगम थेन्नारासू यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्यावर देखरेख करण्याचे तसेच बाधित कुटुंबांना धीर देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडितांना सर्वतोपरी मदत सुनिश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news