

Tamil Nadu School Bus Accident
कडलूर : तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानकुप्पम गावात आज (दि. ८) सकाळी भीषण अपघात झाला. एक स्कूल बस रेल्वे फाटक ओलांडत असताना, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या रेल्वेने बसला जोरदार धडक दिली. यात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने कडलूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये पाच विद्यार्थी होते.
चेम्मनकुप्पमजवळ एका स्कूल बसच्या चालकाने रेल्वे येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चिदंबरमकडे जाणाऱ्या रेल्वेने बसला धडक दिली. अपघाताच्या वेळी बसमध्ये शाळकरी मुले होती. धडक इतकी भीषण होती की, व्हॅन सुमारे ५० मीटरपर्यंत फरफटत गेली. यावेळी बसमध्ये बसलेल्या मुलांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला. धडकेचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी धावले आणि त्यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
गंभीर जखमी झालेल्या चालकासह इतर मुलांना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा अपघात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला. रेल्वे आल्याने वाहतूक थांबवण्यासाठी फाटक बंद करत असताना बस चालकाने रुळ ओलांडण्याचा आग्रह धरला. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि जिल्हा प्रशासनाने तपास सुरू केला आहे.