

पुढारी ऑनलाईन डेस्क : CM MK Stalin | हिंदी आणि तमिळ भाषेवरून केंद्र आणि तामिळनाडू सरकारमध्ये वाद सुरू आहे. या भाषिक वादादरम्यान एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील कागदपत्रात भारतीय राष्ट्रीय चलन चिन्ह 'रुपया'च्या लोगोमध्येच बदल केला आहे. त्यामुळे हा भाषिक वाद आणखी वाढल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), २०२० मध्ये प्रस्तावित केलेल्या त्रिभाषिक सूत्रावरून केंद्र सरकार आणि द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुकच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारमध्ये वाद सुरू आहे. आता तामिळनाडूतील मुख्यमंत्री एमके स्टॅलिन सरकारने राज्य सरकारच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्प कागदपत्रावरून भारतीय 'रुपया'चा 'रु' लोगो काढून त्याजागी तमिळ भाषेतील 'रु' चिन्ह छापण्यात आले आहे.
तामिळनाडूतील एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारने पुन्हा एकदा भाषिक वाद निर्माण केला आहे, यावेळी राज्य कागदपत्रांमध्ये सार्वत्रिक मान्यताप्राप्त भारतीय रुपया चिन्हाच्या जागी तमिळ लिपीचा वापर करून राष्ट्रीय चिन्हांबद्दलची ही उघड उपेक्षा म्हणजे त्यांचा विभाजनकारी भाषिक अजेंडा पुढे नेण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. ज्यामुळे पक्षाने दीर्घकाळापासून सुरू ठेवलेला उत्तर-दक्षिण भारतातील वादात आणखी एक ठिणगी पडली आहे. भारताच्या आर्थिक ओळखीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिन्हाला बाजूला ठेवून, स्टॅलिन सरकारने सामूहिक प्रगतीपेक्षा प्रादेशिक राजकारणाला प्राधान्य देऊन राष्ट्रीय एकतेविरुद्धचा आपला विरोध दर्शविला आहे.