

Tamil Nadu Crime Lesbian Couple Arrested Killing 5 Month Old Son
तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केलमंगलमजवळ पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाची हत्या केल्याप्रकरणी, बाळाची आई असलेल्या २५ वर्षीय महिलेला आणि तिच्या समलिंगी मैत्रिणीला गुरुवारी (दि.६) अटक करण्यात आली आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. केलमंगलम पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची ओळख एस. भारती (वय २५, रा. चिन्नट्टी) आणि तिची याच गावातील समलिंगी मैत्रीण सुमित्रा (वय २२) अशी पटवली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीचा विवाह ३८ वर्षीय के. सुरेश याच्याशी झाला होता. या जोडप्याला ५ आणि ३ वर्षांच्या दोन मुली आणि ध्रुवन नावाचा केवळ ५ महिन्यांचा एक मुलगा होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीचे सुमित्रासोबत प्रेमसंबंध होते. सुरेशला या संबंधांबद्दल कळल्यावर त्यांच्यात वाद होऊ लागले. या कौटुंबिक कलहामुळे सुरेशच्या धाकट्या बहिणीला मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी लागली. काही दिवसांपूर्वी सुरेशसोबत झालेल्या भांडणानंतर भारती कुंथमरणपल्ली येथील माहेरच्या घरी गेली होती, परंतु कुटुंबातील सदस्यांच्या मध्यस्थीने तिला घरी परत आणले गेले.
२ नोव्हेंबर रोजी सुरेश आणि इतर कुटुंबीय कामावर गेले होते. संध्याकाळी घरी परतल्यानंतर सुरेशला आपल्या ५ महिन्याच्या मृत्यू झाल्याचे समजले. तेव्हा श्वास गुदमरून मुलाचा जीव गेल्याचे पत्नी भारतीने रडरडत सांगितले. कुटुंबीयांनी भारतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि अंत्यसंस्कार करून बाळाला दफन केले, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
फरम्यान, मंगळवारी (दि. ४), सुरेशने अचानक आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आणि केलमंगलम पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत झटपट तपास सुरू केला. भारतीची कसून चौकशी करण्यात आली. यादरम्यान भयंकर सत्य उघड झाले, भारतीनेच सुमित्राच्या मदतीने बाळाची हत्या केल्याचे उघड झाले. या हत्येचा संपूर्ण कट सुमित्रानेच रचला होता असे भारतीने सांगितले. यादरम्यान, भारतीने सुमित्राच्या फोनवर हत्येची कबुली देणारा मेसेज पाठवला होता आणि बाळाच्या मृतदेहाचा फोटोही शेअर केला होता, हेही समोर आले आहे. कबुलीजबाबानंतर पोलिसांनी भारती आणि त्यानंतर सुमित्रा यांना अटक केली.
पोलिसांना या समलिंगी जोडप्याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील तपासदरम्यान सापडले आहेत. भारती आणि सुमित्रा यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायिक कोठडी सुनावण्यात आली आहे.