

Swiggy agent father News in Delhi
दिल्ली: एका वडिलांचे मुलीवरील जीवापाड प्रेम पाहून अनेक जण आवाक झाले आहेत. या बाप-लेकीची कहानी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही गोष्ट दिल्लीतील गुरूग्राममधील आहे. फूड डिलिव्हरीच काम करणारे पंकज स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. यावेळी त्याच्यासोबत त्यांची २ वर्षाची मुलगी देखील असते. एका स्विगी डिलिव्हरी बॉयची कहाणी गुरुग्राम येथील एका कंपनीचे सीईओ मयंक अग्रवाल यांनी त्यांच्या लिंक्डइनवर शेअर केली आहे.
फूड डिलिव्हरीचं काम करत असलेल्या पंकजची हृदयस्पर्शी जीवन कहानी ऐकूण तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल. स्विगीचा डिलिव्हरी बॉय पंकज त्याच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत ऑर्डर देण्यासाठी जातोय. मुलीला जन्म देताच पंकजच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे जन्मताच ही पोरगी आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहे. तिची सर्व जबाबदारी तिच्या वडीलांवर येऊन पडली. तर पंकज यांचा मोठा मुलगा कोचिंग क्लासेसला जातो. त्यामुळे पंकजला त्याच्या मुलीला सोबत आणावे लागते. पंकज यांची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पंकजच्या जीवनातील अडचणी तरीही वडिलांचे मुलीवरील प्रेम पाहून काही नेटकरी भावूक झाले. तर काही नेटकऱ्यांनी माणूसकी विसरत पंकजला घरी बसण्याचा सल्ला देखील दिला आहे.
मयंक अग्रवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकदा फूड डिलिव्हरी एजंट त्यांच्या घरी ऑर्डर घेऊन आला होता. त्यांनी त्याला वर येण्यास सांगितले, पण त्याच वेळी फोनवर एका लहान मुलाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे ते स्वतः खाली गेले. तिथे त्यांनी पाहिले की डिलिव्हरी बॉय पंकज आपल्या मुलीसोबत बाइकवर थांबलेला आहे. अग्रवाल यांनी पंकजला विचारले की, तो आपल्या मुलीला कामावर का घेऊन येतो? यावर पंकज म्हणाला की, घरात तिची देखभाल करणारे कोणीच नाही. त्यांचा मोठा मुलगा टुनटुन संध्याकाळी कोचिंग क्लासला जातो, त्यामुळे मुलीची देखभाल करण्याची जबाबदारी त्याच्यावरच येते.
मयंक अग्रवाल यांनी LinkedIn वर लिहिले, “मिस्टर पंकज, एक स्विगी डिलिव्हरी पार्टनर, आपल्या लहान मुलीसोबत काम करतात, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. ना कोणतीही चाइल्ड केअर सुविधा, ना सुरक्षिततेची हमी – फक्त एक बापाचं अपार प्रेम आणि जिद्द आहे.” अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, काही ग्राहकांनी पंकजला सुनावलं, “जर तुझ्याकडून नीट होत नसेल, तर घरी बस. मूल आहे हे तुझाच प्रॉब्लेम आहे.” यावर अग्रवाल यांनी लिहिलं, “एक समाज म्हणून आपण नक्की कुठे चाललो आहोत?” या कठोर प्रतिक्रियांबद्दल पंकजने कोणतीही तक्रार केली नाही. फक्त हलकंसं हसून गप्प राहिला. अग्रवाल म्हणतात, “आपण किती गोष्टींना फारच हलकं समजतो, पण असे किती लोक असतात जे न बोलता असाधारण ओझं वाहत असतात.”
या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, अशा पोस्ट्स फक्त गोष्टी नाहीत, त्या आरश्यासारख्या आहेत. चला, आपण सगळे मिळून काहीतरी चांगलं करूया. दुसऱ्या युजरने कमेंट केली, डिलिव्हरी बॉय हे यंत्र नाहीत, ते देखील माणूस आहेत. बेरोजगारीमुळे आणि असमान व्यवस्थेमुळे त्यांच्या वाट्याला अन्याय येतोय. एका तिसऱ्या युजरने लिहिले, या जगात वडिलांच्या प्रेमाला अनेकदा कमी लेखलं जातं. ते त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत, पण हे सगळं त्यांचं प्रेम आणि त्याग दाखवून जातं.”