पुढारी ऑनलाईन डेस्क : मी केंद्रीय गृहमंत्री असताना श्रीनगरच्या लाल चौकात जायलाही मला भीती वाटत होती, असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी सोमवारी (दि.९) केले होते. शिंदेंच्या या वक्तव्याची चर्चा सध्या देशभरात सुरू असून 'यूपीए-एनडीए फर्क देख लो' अशी टीका भाजपकडून केली जात आहे. यावर आता शिंदे यांनी आपल्याच वक्तव्यावर स्पष्टीकरण देत भाजप विधानाचा चुकीचा अर्थ काढत असल्याचे म्हटले आहे.
सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे त्यांनी स्वतः लिहिलेल्या 'फाईव्ह डीकेडस् ऑफ पॉलिटिक्स' (Five Decades of Politics) या पुस्तकाच्या सोमवारी सायंकाळी दिल्लीत झालेल्या प्रकाशन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उपस्थित होते. शिंदेंनी यावेळी त्यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याबद्दल आठवण काढली. ते म्हणाले की, गृहमंत्री होण्यापूर्वी त्यांना (शिक्षणतज्ज्ञ विजय धर) भेटायला गेलो होतो. मी त्यांना सल्ला विचारायचो, त्यांनी मला सल्ला दिला. इकडे-तिकडे फिरू नका, तर श्रीनगरच्या लाल चौकात जा, मी गेलोही. धर यांच्या सल्ल्याने मला प्रसिद्धी खूप मिळाली; पण खरे सांगायचे तर मी त्यावेळी घाबरलेलो होतो, असे शिंदे यांनी म्हटले होते.
सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) त्यांच्या वक्तव्यावर बुधवारी (दि. ११) सोलापूर येथे एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हणाले की, "ही एक सहजपणे केलेली टिप्पणी होती. भाजपला वक्याचा अर्थ समजत नाही. त्यामुळेच त्यावर टीका करत आहेत."
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या 'एनडीए' सरकारमध्ये काश्मिरात दहशतवादी भयाच्या छायेत आहेत आणि श्रीनगरच्या लाल चौकात कोणीही फिरू शकतो. कलम ३७० हटवल्याचा हा परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या या वक्तव्यावर भाजपमधून व्यक्त होत आहे.