

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार असा थेट इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला संदेश पोहोचवल्याचेही समजते.
राज्य मंत्रिमंडळात असलेले माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला. तत्पूर्वी धनंजय मुंडे दिल्लीत येऊन अमित शाह यांना भेटून गेले. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार, अशा चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना आधीच विरोध सुरू झाला आहे. बुधवारी धनंजय मुंडे हे कुठल्याही परिस्थितीत मंत्री होणार नाही, असे वक्तव्य बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीही थेट विरोध दर्शविल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारमधील प्रमुख लोकांशी संपर्क केला आणि धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार असतील तर बीडमध्ये जाऊन उपोषण करणार, असा इशारा दिला. गुरुवारी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचा पदभार काढून घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक करते. मात्र मला धनंजय देशमुख यांचा फोन आला होता, ते खूप अस्वस्थ आहेत. धनंजय मुंडे अमित शाह यांना का भेटले, त्यांनी मुळात वेळच का दिली असावी, आरोप झालेली व्यक्ती केंद्रीय गृहमंत्री यांना का भेटते, हा प्रश्न आहे. आरोप सिद्ध झाले नसले तरी आरोप झालेल्या व्यक्तीला देशाचे गृहमंत्री वेळ देतात, यामुळे मला दुःख झाले. आमच्या गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे म्हणत या भेटीवर त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसेच सत्तेतील आमदाराला दिल्लीत काम घेऊन का यावे लागते, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रज्ञा सातव यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, माझे आणि सातव कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. सातव कुटुंबांचे गांधी कुटुंबासोबत चांगले संबंध होते. प्रज्ञा सातव यांचा राजीनामा विरोधी पक्षनेते पदासाठी राजीनामा द्यायला लावला असेल, ही शक्यता नाकारता येत नाही मात्र हे सशक्त लोकशाहीसाठी चांगल नाही. तर मुंबईतील निवडणुकांसंदर्भात बोलताना म्हणाल्या की, भाजपला नवाब मलिक यांची लेक चालते पण नवाब मलिक भाई चालत नाहीत. हा नवाब मलिक आणि कुटुंबावर अन्याय आहे. नवाब मलिक भाजपला सोयीने चालतात. मात्र मी मलिक कुटुंबासोबत मी उभी आहे, असेही त्यांनी सांगितले.