Supriya Sule On Vice President Election :
संसदेत आज (दि. ९) उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. यासाठी देशातील सर्व खासदार संसदेत उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील मतदानासाठी पोहचल्या असून त्यांनी माध्यमांशी बोलताना इंडिया आघाडीची निवडणुकीत काय स्थिती आहे याबाबत भाष्य केलं.
त्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल म्हणाल्या, 'आपण जेव्हा परीक्षेला बसतो त्यावेळी आपण पास होण्यासाठीच बसतो. आम्ही देखील उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठीच प्रयत्न करत आहोत. ही आमची वैचारिक लढाई आहे. ही वैयक्तिक लढाई नाही.
दरम्यान, या निवडणुकीत काही मतं फुटणार अशी चर्चा आहे याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी चर्चा तर होतच असते. आम्हाला आमच्या खासदारांवर विश्वास आहे. सुप्रिया सुळेंनी आम्ही काही मतं मिळवण्यासाठी घर फोडत नाही असं म्हणत भाजपला टोला लगावला. त्या पुढे म्हणाल्या सर्व जण सद्सद् विवेक बुद्धीने मतदान करतील. सुप्रिया सुळे यांनी जे भाजपचे मित्रपक्ष राहिले आहेत ते अशी भूमिका का घेत आहेत असा सवाल केला.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफबद्दल देखील आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळं देशातील सॉफ्टवेअर कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे असं सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात सेसचा प्रश्न उभा राहिला आहे. याबाबत केंद्र सरकारनं विचार करावा अशी देखील मागणी केली.
सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि फिनिक्स पक्षी याबाबत देखील वक्तव्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला कधी वाटलं नाही की त्यांची राख होईल. हे असलं कोणाच्या ध्यानी मनी नसतं. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील भाष्य केलं. त्यांनी आपल्याकडे जी गुंतवणूक येणार होती ती येत नाहीये. सरकारनं ज्या पद्धतीनं कर्ज काढलं आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्फर केले जात नाही. खर्चाचा आणि मिळकतीचा काही ताळमेळ नाही. अवघड आहे. असं म्हणत अप्रत्यक्षरित्या अजित पवारांच्या अर्थ खात्यावर टीका केली.
मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या नव्या जीआरवरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, सगळ्याच समाजामध्ये गोंधळाचं वातावरण आहे. कोणाला काहीच कळत नाहीये. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि महाराष्ट्राला सर्व काही सांगावं.