

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी कथित अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. समितीने मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नवी दिल्लीतील ३०, तुघलक क्रिसेंट येथील न्यायमूर्ती वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन चौकशी केली. यावेळी समितीचे सदस्य जवळपास ४५ मिनिटे तिथे थांबले. त्यांनी आग लागलेल्या स्टोअर रूमची पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. (Justice Yashwant Verma)
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या आदेशानुसार या त्रिसदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बदलीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलॉजियमने केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने संकेतस्थळावर जारी केला आहे. या निर्णयावर अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशनने आक्षेप घेतला आणि अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे.