

Delhi Stray Dogs
दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये स्थलांतरित करण्याचा सक्त आदेश दिल्यानंतर श्वानप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना बाहेर उभे असलेले श्वानप्रेमी आणि तिथे उपस्थित असलेल्या वकिलांमध्ये हाणामारी झाली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या श्वानप्रेमींनी आपला सगळा राग वकिलांवर काढल्याचे दिसून आले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, ज्यामध्ये काही लोक आणि वकील एकमेकांची कॉलर पकडून मारामारी करताना स्पष्ट दिसत आहेत. यावेळी श्वानप्रेमी मोठ्याने आरडाओरड करत वकिलांना शिवीगाळ करत असल्याचेही पाहायला मिळाले. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तणाव रस्त्यावर उतरल्याचे हे चित्र होते.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवावे. रस्त्यावर कुत्रे दिसू नयेत. दुसरीकडे, जर कोणताही प्राणीप्रेमी या निर्णयाच्या मार्गात आला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल. काही लोक न्यायालयाच्या निर्णयावर खूश आहेत, तर काहींना तो अजिबात आवडला नाही. सर्वोच्च न्यायालयाबाहेर सुनावणीच्या दिवशी काही लोकांचा राग उफाळून आला.
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयावर केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक नेते आणि चित्रपट कलाकारांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय चिंताजनक आणि अमानुष असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत, थेट न्यायालयाच्या आवारातच नागरिकांनी वकिलांवर हात उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
यावर बोलताना पशू अधिकार कार्यकर्त्या आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. "हा निर्णय आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अव्यवहार्य असून परिसंस्थेच्या संतुलनासाठी अत्यंत हानिकारक आहे," असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत अंदाजे ३ लाख भटके कुत्रे आहेत. या सर्वांना पकडून निवारागृहात पाठवण्यासाठी सरकारला किमान १ ते २ हजार निवारागृहे उभारावी लागतील. त्यासाठी आधी जमीन शोधावी लागेल. यासाठी ४ ते ५ हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. प्रत्येक केंद्रात काळजीवाहू, स्वयंपाकी, खाऊ घालणारे आणि सुरक्षारक्षक यांची व्यवस्था करावी लागेल. या कुत्र्यांची देखभाल आणि त्यांच्या खाण्यापिण्यावर वर्षाला सुमारे १०,००० कोटी रुपये खर्च येईल. दिल्ली सरकारकडे एवढा मोठा निधी या कामासाठी उपलब्ध आहे का? असा सवाल मेनका गांधी यांनी उपस्थित केला आहे.