Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची मंत्री विजय शाह यांना कडक फटकार; सोफिया कुरेशी प्रकरणात माफी न मागितल्याने हेतूवर संशय
नवी दिल्ली: भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांना कडक शब्दांत फटकारले. मंत्र्यांनी आतापर्यंत जाहीरपणे माफी न मागितल्याने त्यांच्या हेतूवर आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, अशा शब्दात न्य़ायालयाने मंत्री मंत्री विजय शाह यांना सुनावले. एका मंत्र्याने लष्करी अधिकाऱ्याच्या सन्मानाविरुद्ध बोललेले शब्द खूप गंभीर आहेत आणि त्यांचे वर्तनही न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेवर परिणाम करते, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाला (एसआयटी) १३ ऑगस्टपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की हा केवळ राजकीय वाद नाही तर एका लष्करी अधिकाऱ्याच्या आत्मसन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, ज्यावर न्यायपालिकेला संवेदनशीलतेने वागावे लागेल. मंत्री विजय शाह यांनी यापूर्वी सांगितले होते की, ते न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन माफी मागतील, मात्र आतापर्यंत त्यांच्याकडून सार्वजनिक व्यासपीठावर माफी मागण्यात आलेली नाही.
त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या या हेतूंबद्दल शंका व्यक्त केली आणि अशा लोकांनी सार्वजनिक जीवनात जबाबदारीने वागले पाहिजे, असे म्हणत तंबी दिली. १८ ऑगस्ट रोजी न्यायालय पुन्हा या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. एसआयटीच्या एका सदस्याला १८ ऑगस्ट रोजी अहवालासह न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहावे लागेल, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल कुरेशी यांचे नाव न घेता वादग्रस्त विधान केले होते. "आमच्या मुलींना विधवा करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवले." असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान कर्नल कुरेशी यांच्याबाबात विजय शाह यांनी केले होते. त्यानंतर मंत्री शाह यांनी 'एक्स'वर एका व्हिडिओद्वारे वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

