

Supreme Court on Pune Porsche accident
नवी दिल्ली : "मुलांच्या हातात महागड्या गाड्या आणि अमाप पैसा देणारे पालकच मद्यधुंद अवस्थेत होणाऱ्या अपघातांना खऱ्या अर्थाने जबाबदार आहेत," असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. २) व्यक्त केले. देशभराला हादरवून सोडणार्या २०२४ मधील 'पुणे पोर्श अपघात' प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी हे मौखिक निरीक्षण नोंदवले.
पोर्शे कारचालक अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन आरोपींना न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. यावेळी न्यायमूर्ती नागरत्ना यांनी पालकांच्या भूमिकेवर तीव्र ओढ ओढली. "या अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक कारस्थाने रचली गेली. आरोपींना केवळ दीर्घकाळ कारागृहात राहावे लागल्यामुळे आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आम्ही जामीन देत आहोत," असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
पालकांकडे मुलांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला वेळ नाही. त्यामुळे संवादाला पर्याय म्हणून मुलांच्या हातात पैसे आणि एटीएम कार्ड दिले जाते. परिणामी, मुले मोबाईल आणि पैशांच्या जोरावर स्वतःच्या मर्जीने वागू लागतात.नशा करून भरधाव वेगाने गाडी चालवणे आणि रस्त्यावरील निष्पाप लोकांना चिरडणे याला सेलिब्रेशन म्हणता येणार नाही," असे न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या. "चालू असलेल्या खटल्यावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही सविस्तर निरीक्षणे नोंदवत नाही आहोत. परंतु, आपल्या मुलांवर नियंत्रण न ठेवल्याबद्दल आई आणि वडील दोघेही दोषी आहेत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी निदर्शनास आणून दिले की, अशा प्रकरणांमध्ये आता एक ठराविक 'पॅटर्न' तयार झाला आहे. "एखाद्या गरीब ड्रायव्हरला गुन्ह्यात अडकवायचे, रक्ताचे नमुने बदलायचे आणि दारू प्यायल्याचे नाकारून ३ वर्षात सुटून जायचे," असे त्यांनी सांगितले. यावर सहमती दर्शवत न्यायमूर्तींनी "कायद्याला अशा लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे," असे मत व्यक्त केले.
कल्याणीनगर येथे १८ मे २०२४ च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने 'पोर्शे' कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. कारचालक मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या त्याच्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे या मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्यांच्या पालकांनी आरोपी डॉक्टरांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. आदित्य सूद व आशिष मित्तल यांनी कारमधील इतर दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी स्वतः च्या रक्ताचे नमुने दिले होते; तर हे नमुने बदलण्यासाठी अमर गायकवाडने डॉक्टरांच्या सहायकाला तीन लाख रुपये दिल्याचे आरोपपत्रात नमूद केले.