

नवी दिल्ली: शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी शिक्षा पूर्ण झालेल्या कैद्यांना तुरुंगातून तात्काळ सोडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.
२००२ च्या नितीश कटारा हत्याकांडातील सुखदेव यादव उर्फ पहेलवानची सुटका करण्याचे आदेश देताना न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. यादवने या वर्षी मार्चमध्ये २० वर्षांची शिक्षा पूर्ण केली. त्यानंतर त्याची सुटका करणे अपेक्षित होते, असे खंडपीठाने म्हटले. न्यायालयाच्या या आदेशाची प्रत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गृह सचिवांना पाठवावी जेणेकरून कोणताही आरोपी किंवा दोषी शिक्षेच्या कालावधीपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला आहे का? हे तपासता येईल, असे खंडपीठाने म्हटले.