

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आम्ही फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याच्या बाजूने नाही. जनतेच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी विद्यमान नियमांच्या कठोर अंमलबजावणीच्या गरजेवर भर दिला. याचवेळी न्यायालयाने प्रदूषणाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी सेलिब्रिटींची मदत का घेत नाही, अशी विचारणा करत सरकारला क्रिकेटपटू विराट कोहलीसारख्या लोकप्रिय व्यक्तींचा समावेश असलेल्या जनजागृती मोहिमा सुरू करण्याचा सल्ला दिला.
दिल्ली-एनसीआरमधील वाढती प्रदूषण पातळी आणि फटाक्यांच्या बंदीच्या मुद्द्यावर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी दिल्ली सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सरकार प्रदूषणाच्या मुकाबल्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. बीएस-६ उत्सर्जक मानकांचे पालन न करता बाहेरून येणार्या वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या कामाच्या वेळांत बदल केल्याचेही त्यांनी सांगितले.
बांधकामांजवळ अँटी स्मॉग गन
राजधानीतील बांधकाम साईटस् जवळ ६०८ अँटी स्मॉग गन बसवल्या आहेत. प्रदूषण नियंत्रणासह त्यावर मात करण्यासाठी वार्षिक प्रदूषण नियंत्रण योजना, समर्पित नियंत्रण कक्ष व ‘वायू रक्षक’ उपक्रम यांसारखे उपाय लागू केल्याची माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली. सुनावणीदरम्यान फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाचाही विषय निघाला. यावर न्यायालयाने नमूद केले की, दिवाळीचा सण सकारात्मक वातावरण निर्माण करतो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात ठेवून सणाच्या काळात नियमांचे पालन होण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ निर्बंध लादणे हा प्रदूषणाच्या सामन्यासाठी किरकोळ उपाय आहे. जनजागृतीसह अधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालनाची खात्री करणे गरजेचे आहे. सोबतच न्यायालयाने दिवाळी काळात वाढीव सतर्कता बाळगणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला.
प्रत्येकाची मानसिकता व वागणूक रातोरात बदलणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. लोकांच्या सवयी बदलण्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी जनजागृती मोहिमांसोबतच नियमांची कठोर अंमलबजावणी गरजेची आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आसपासच्या दोन दिवसांत विशेष सतर्कता बाळगावी.
सर्वोच्च न्यायालय