

नवी दिल्ली ः मंदिरांमध्ये श्रीमंतांकडून पैसे घेऊन ‘विशेष पूजा’ करण्याची परवानगी देण्याच्या प्रथेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. यामुळे देवतेच्या विश्रांतीच्या वेळेत व्यत्यय येतो, देवाला एक मिनिटासाठीही विश्रांती घेऊ दिली जात नाही, असे न्यायालयाने म्हटले.
उत्तर प्रदेशातील बांके बिहारी मंदिरात श्रीमंत लोकांना विशेष पूजा करू दिली जाते. यावरून सर्वोच्च न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली. मंदिरातील दर्शन वेळ आणि प्रथांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर मंदिर व्यवस्थापन समिती आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली.
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, दुपारी 12 वाजता मंदिर बंद केल्यानंतर देवाला एक मिनिटासाठीही विश्रांती घेऊ दिली जात नाही. जे श्रीमंत लोक मोठी रक्कम देऊ शकतात, त्यांनाच विशेष पूजा करण्याची परवानगी दिली जाते. याचिकाकर्त्याने यावर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्च अधिकार समितीच्या काही निर्णयांवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.
याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी दर्शनाच्या वेळा आणि मंदिरातील प्रथांमधील बदलांवर चिंता व्यक्त केली आणि अशा बाबी काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी काही प्रमाणात संवेदनशीलतेची आवश्यकता आहे, असे दिवाण म्हणाले.
सुनावणीदरम्यान खंडपीठाने उच्चाधिकार मंदिर समितीच्या सदस्य सचिवांना प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देशही दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल.