

TMC MP resigns
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकतील पराभवानंतर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची पडझड सुरुच राहिली आहे. एकीकडे विधानसभेतील आमदारांनी वेगळा गट केला असतानाच आता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर राय यांनी आपल्या खासदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेल्या आहेत. यावेळी कोलकात्यात त्यांच्या सर्वात विश्वासू आणि ज्येष्ठ नेत्याने राजीनामा दिल्याने तृणमूलमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
सुखेंदु शेखर राय यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना म्हटलं आहे की, नुकत्याच पार पडलेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत मतदारांनी तृणमूल काँग्रेसला पूर्णपणे नाकारले असून भाजपला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. जनतेने दिलेल्या या ऐतिहासिक आणि स्पष्ट कौलाचा आदर करत आपण आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजीनामा पत्रात राय यांनी तृणमूल काँग्रेसच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. पक्षात १५ वर्षांच्या राजवटीत झालेला प्रचंड भ्रष्टाचार, महिलांवरील वाढते अत्याचार, कोलमडलेली कायदा व सुव्यवस्था, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अपयश यामुळेच जनतेने पक्षावर पूर्ण अविश्वास दाखवला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
आपला निर्णय तात्काळ अमलात आणत सुखेंदु शेखर राय यांनी दिल्लीतउपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच, त्यांनी पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांना ईमेलद्वारे आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवल्याचे समजते.