

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sudha Murthy : ‘जेव्हा लोक एखादी गोष्ट गंभीरतेने आणि उत्साहाने करू इच्छितात, तेव्हा वेळ कधीही मर्यादा ठरत नाही,’ अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार सुधा मुर्ती यांनी त्यांचे पती नारायण मूर्ती यांच्या ‘70 तास काम’ करण्याच्या सल्ल्यावर दिली आहे. एका न्यूज चॅनलने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केले.
सुधा मुर्ती पुढे म्हणाल्या, ‘जेव्हा एखादे काम आवड, समर्पण आणि जिद्दीने केले जाते, तेव्हा वेळेची मर्यादा महत्त्वाची राहत नाही. नारायण मूर्ती यांनी कठोर मेहनत, योग्य टीम आणि वेळेचा सदुपयोग यांच्या जोरावर इन्फोसिससारखी कंपनी उभी केली. या दिर्घ प्रवासात मी स्वतः कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली, जेणेकरून माझे पती त्यांच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करू शकतील.’
‘ही गोष्ट केवळ IT क्षेत्रापुरती मर्यादित नाही. वैद्यकीय, पत्रकारिता किंवा अनेक क्षेत्रांमध्ये कामाच्या वेळेचे बंधन नसते. येथे महत्त्वाचे असते ते प्राधान्यक्रम आणि आवड. जर कोणाला आपल्या कामाची खरी आवड असेल, तर 70 तास काय किंवा 90 तास काय ती व्यक्ती काम करत राहते. असे करणे त्या व्यक्तीला ओझे वाटत नाही. पण हे प्रत्येकासाठी आवश्यक नाही. वेळेचा सदुपयोग ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. कोणी वर्क-लाइफ बॅलन्स पसंत करतो, तर कोणी आपल्या करिअरला प्राधान्य देतो,’ असे मतही सुधा मुर्ती यांनी व्यक्त केले.
सुधा मूर्ती म्हणाल्या की, ‘सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेमध्ये दोन स्पष्ट गट दिसतात. एक गट असा आहे जो वर्क-लाइफ बॅलन्स आणि मानसिक आरोग्याचे समर्थन करतो, तर दुसरा गट असा आहे जो देशाच्या प्रगतीसाठी मेहनत आवश्यक मानतो. माझ्या पतीने इन्फोसिस उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण कामाप्रती समर्पित असणारे मौल्यवान सहकारी होते. त्यांनी 70 तास किंवा कधी कधी त्याहूनही अधिक वेळ काम केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे इन्फोसिसचा पाया भक्कम झाला.’
‘जेव्हा नारायण मूर्ती यांनी माझ्यासोबत वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली, तेव्हा मी त्यांना सांगितले, तुम्ही इन्फोसिसची काळजी घ्या. मी कुटुंबाची जबाबदारी घेते. मी हा निर्णय घेतला आणि हेही ठरवले की सतत तक्रार करून किंवा पतीला तुम्ही आमच्यासोबत नाही असे सांगण्यात काही अर्थ नाही. मी यातून शिकले की मला स्वतःचा मार्ग शोधायचा आहे, व्यस्त राहायचे आहे. पती वेळ देत नाही या विचाराने स्वत:ला त्रास करून घ्यायचा नाही. उलट, मिळालेल्या वेळेचा आनंद घ्यायचा. मी आधीही लेखन करत होते, पण मग मी थोडे अधिक लिहायला सुरुवात केली,’ अशी भावना यक्त केली.
या कार्यक्रमात, सुधा मुर्ती यांनी हिंदी आणि तमिळ भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर ‘भाषा’ हा मुद्दा अधोरेखीत केला. त्यांनी त्यांच्या अनुभवातून आलेला दृष्टिकोन मांडला. त्या म्हणाल्या, एकमेकांना जोडण्यासाठी भाषा हा एक महत्त्वाचा सेतू आहे. त्यातून संघर्ष होता कामा नये. हुबळीत वाढताना अनेक भाषा आत्मसात करणे असो किंवा सुनामीच्या काळात मदत कार्यासाठी तमिळ शिकणे असो, प्रत्येक नवीन भाषा ही एक नवीन सेतू उभारते. त्यातून अडथळा निर्माण होत नाही, असे माझे मत आहे.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘अनेक भाषा शिकणे फायदेशीरच नव्हे, तर आवश्यक आहे. मला तमिळनाडूमध्ये काम करायचे होते, म्हणून मी एक शिक्षक नेमला आणि तमिळ शिकले. मी हळूहळू का होईना ही भाषा वाचू शकते, यामुळेच मला त्सुनामीदरम्यान मदत कार्य करताना मोठी मदत झाली. भाषा शिकणे म्हणजे नवे सेतू तयार करणे. मुलं कोणतीही भाषा सहज शिकू शकतात. भाषा हे एक साधन आहे, एक सेतू आहे. आपण सगळे वेगवेगळी बेटे आहोत आणि आपल्याला जोडणारा एकमेव सेतू म्हणजे भाषा. त्यामुळे अधिकाधिक सेतू असावेत. कारण ते आपल्या कामासाठी उपयुक्त ठरतात.’