Sudha Murty cyber fraud
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार आणि समाजसेविका सुधा मूर्ती सायबर फसवणुकीच्या शिकार झाल्या आहेत. एका अज्ञात सायबर हॅकरने दूरसंचार विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना फोन केला. या घटनेनंतर मूर्ती यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली असून, हॅकरने त्यांच्या मोबाईल नंबरवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित होत असल्याचा दावा केला.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सुधा मूर्ती यांना ५ सप्टेंबर रोजी एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याचा दावा केला. या व्यक्तीने मूर्ती यांना सांगितले की, त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून काही अश्लील व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित होत आहेत. जर त्यांनी सहकार्य केले नाही, तर दुपारपर्यंत त्यांची मोबाईल सेवा खंडित करण्याची धमकीही त्याने दिली. विशेष म्हणजे, ट्रू-कॉलरवर या नंबरचे नाव 'टेलिकॉम डिपार्टमेंट' असे दिसत होते.
या सायबर फसवणुकीबाबत सुधा मूर्ती यांनी बेंगळूरूच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॅकरने दूरसंचार विभागाचा अधिकारी असल्याचे खोटे सांगून मूर्ती यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.