

Strait of Hormuz Reopens : संपूर्ण जगाला वेठीस धरणारे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध अखेर थांबले आहे. उभय देशांमध्ये शांतता करारावर सहमती झाली आहे. यामुळे १०७ दिवस सुरु असलेले हे युद्धाला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील करार निश्चित झाल्यानंतर, भारतीय ध्वज असलेले 'दिशा' हे एलएनजी (LNG) जहाज अखेर सुरक्षितपणे बाहेर पडले आहे. युद्धग्रस्त होर्मुज जलडमरूमध्य (Strait of Hormuz) भागातून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर सुरक्षित बाहेर पडणारे हे पहिले भारतीय जहाज ठरले आहे. हे जहाज १८ जून रोजी भारतात पोहोचेल. 'दिशा' जहाजाच्या सुटकेमुळे आता इतर ३४ जहाजांबाबतही आशा पल्लवित झाल्या आहेत.
पर्शियन आखातात अडकलेल्या इतर ३४ जहाजांनाही लवकरच हिरवा कंदील मिळू शकतो. अशा प्रकारे तेल आणि वायू वाहून नेणारी जहाजे भारतात पोहोचल्याने अडचणी कमी होतील आणि पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या टंचाईतून सुटका होईल.
रिपोर्टनुसार, पर्शियन आखातात अडकलेल्या जहाजांपैकी किमान १६ जहाजांमध्ये खते आहेत.विश्लेषकांच्या मते, तेल आणि वायूचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत होऊन दिलासा मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. कारण, अमेरिका आणि इराणमधील हल्ल्यांमध्ये अनेक प्लांट (संयंत्र) उद्ध्वस्त झाले आहेत. कतारमधील 'रास लफ्फान' प्लांट पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास काही काळ जाईल. भारताचा कतारच्या रास लफ्फानसोबत दीर्घकालीन करार आहे आणि भारत येथून मोठ्या प्रमाणावर गॅस खरेदी करतो.
संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) 'हबशान गॅस प्लांट' देखील या संघर्षात उद्ध्वस्त झाला असून तो सध्या पूर्ण क्षमतेने काम करत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्लांट आता ६० टक्के कार्यरत झाला आहे, मात्र उर्वरित ४० टक्के दुरुस्तीसाठी अजून काही वेळ लागेल. २०२७ च्या सुरुवातीपर्यंत हा प्लांट ८० टक्क्यांपर्यंत काम करू लागेल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर, भारतीय ध्वज असलेल्या केवळ १० जहाजांनी होर्मुज जलवाहिनी ओलांडली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय खलाशांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी नौवहन महासंचालनालय (DG Shipping) हे परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास, शिपिंग कंपन्या आणि इतर भागधारकांच्या (Stakersholders) सतत संपर्कात आहे. कतारमधून मालवाहतुकीसाठी पेट्रोनेट एलएनजीने भाड्याने (चार्टर) घेतलेले 'दिशा' जहाज पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान या जलवाहिनीमध्ये अडकले होते. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) च्या नेतृत्वाखालील समूहाद्वारे व्यवस्थापित केलेले हे जहाज ६२,३७० टन एलएनजी घेऊन होर्मुज जलडमरूमध्यातून सुरक्षितपणे पुढे गेले आहे. अमेरिका-इराणमधील प्राथमिक युद्धविराम करारानंतर या जलवाहिनीतून प्रवास करणाऱ्या पहिल्या काही व्यावसायिक जहाजांपैकी हे एक आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, "'दिशा' हे एलएनजी जहाज सुरक्षितपणे होर्मुज सामुद्रधुनी पार करून पुढे आले आहे आणि ते ६२,३७० टन एलएनजी घेऊन येत आहे. हे जहाज १८ जून रोजी भारताच्या 'दाहेज' बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे."
सध्या आखाती प्रदेशात सुमारे १८,००० भारतीय खलाशी कार्यरत आहेत. खलाशी आणि त्यांच्या कुटुंबासाठी २४ तास हेल्पलाईन सुरू ठेवण्यात आली आहे, तर आतापर्यंत ३,५०० हून अधिक खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतीय जहाजांवर सुमारे ३२५ भारतीय खलाशी तैनात आहेत, तर सध्या या भागात १३ भारतीय जहाजे उपस्थित आहेत.