Tamil Nadu Politics: राजकारण तापलं! तमिळनाडूत पुन्हा निवडणुका होणार? कोणी दिला सल्ला; राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष

Tamil Nadu Resort Politics: विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ मिळण्यात अडचणी येत आहेत. तमिळनाडूमध्ये आता ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू झाल्याची चर्चा आहे.
Tamil Nadu Politics
Tamil Nadu PoliticsPudhari
Published on
Updated on

Tamil Nadu Resort Politics: तमिळनाडूमधील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस अधिकच रंगत चालला असून अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षासमोर बहुमताचा मोठा पेच उभा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतरही सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ अद्याप विजय यांच्या बाजूने स्पष्टपणे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात आता ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’लाही सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

अण्णा द्रमुकच्या काही आमदारांना एका खासगी रिसॉर्टमध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात तणाव वाढला आहे. संभाव्य फोडाफोडीपासून आमदारांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

दरम्यान, ZOHO चे प्रमुख श्रीधर वेंबू यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया देत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मत व्यक्त करताना म्हटलं की, “विजय यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत नाही. या परिस्थितीत जे सरकार अस्तित्वात येईल ते स्थिर राहील, याची खात्री नाही. तमिळनाडूला अधिक सक्षम पर्यायाची गरज आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून पुन्हा निवडणुका घेणं हाच योग्य मार्ग आहे.”

यासोबतच त्यांनी निवडणुकांमध्ये पैशांच्या प्रभावावरही टीका केली. “पुढील निवडणुकांमध्ये पैशांचं वाटप रोखण्यासाठी कठोर उपाययोजना झाल्या पाहिजेत. त्यानंतरच जनतेचा खरा कौल कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.

दुसरीकडे व्हीसीकेचे प्रमुख थोल तिरुमावलवन यांनी विजय यांच्या बाजूने भूमिका घेत राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी तातडीने निमंत्रण द्यावं, अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, “राज्यपालांना आधीच 118 आमदारांचं समर्थनपत्र मागण्याचा अधिकार नाही. जनतेने टीव्हीकेला सर्वात मोठा पक्ष बनवलं आहे. त्यामुळे प्रथम विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी आणि त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करावं.”

Tamil Nadu Politics
Maratha Empire Map: NCERTच्या पुस्तकांमधून मराठा साम्राज्याचा नकाशा का हटवला? राजघराण्यांचे वंशज थेट कोर्टात

थोल तिरुमावलवन यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, विजय यांनी धर्मनिरपेक्ष सरकार स्थापनेसाठी व्हीसीके आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा मागितला आहे. याबाबत पक्षांतर्गत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र, “जनतेचा कौल लक्षात घेता विजय यांनी सरकार स्थापनेची संधी मिळवलीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

तमिळनाडूमध्ये आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. विजय यांना आवश्यक संख्याबळ मिळतं का, कोणते पक्ष त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि राज्यपाल काय भूमिका घेतात, यावर राज्यातील सत्तासमीकरण ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news