Sperm Whale: स्पर्म व्हेल मासेही बोलतात वेगवेगळ्या बोलीभाषा; एआय अभ्यासात आढळली बाराखडी VIDEO

मानवाप्रमाणेच समुद्रातील महाकाय 'स्पर्म व्हेल' माशांचीही स्वतःची बोलीभाषा आणि 'ध्वनींची बाराखडी' असल्याचा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे.
Sperm Whale
Sperm Whalefile photo
Published on
Updated on

Sperm Whale

वॉशिंग्टन: मानवाप्रमाणेच समुद्रातील महाकाय 'स्पर्म व्हेल' माशांचीही स्वतःची बोलीभाषा आणि 'ध्वनींची बाराखडी' असल्याचा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर भूमध्य समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम भागात राहणाऱ्या व्हेल माशांच्या बोलीभाषेत प्रांतीय फरक असल्याचेही संशोधकांनी शोधून काढले आहे. या दुहेरी शोधामुळे प्राण्यांच्या संवाद क्षमतेकडे पाहण्याचा जीवशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला आहे.

अशी तयार होते व्हेल माशांची 'भाषा'

'स्पर्म व्हेल' हे अत्यंत सामाजिक आणि समूहाने राहणारे सागरी सस्तन प्राणी आहेत. समुद्रात हजारो फूट खोलवर शिकार करताना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ते विशिष्ट लयीत आवाजाचे लहान कंपने सोडतात, ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'कोडा' म्हटले जाते. यापूर्वी वैज्ञानिक या आवाजांना केवळ साधे संकेत मानत होते.

परंतु, 'प्रोजेक्ट सीईटीआय' अंतर्गत कॉम्प्युटर मॉडेल्सच्या साहाय्याने ४०० व्हेल माशांच्या हजारो 'कोडा'चे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये असे दिसून आले की, व्हेल मासे त्यांच्या आवाजाचा वेग, लय आणि लहेजा यामध्ये जाणीवपूर्वक बदल करतात. या विविध बदलांतून शास्त्रज्ञांनी १५६ वेगवेगळ्या प्रकारचे 'कोडा' शोधून काढले आहेत. "आम्हाला व्हेल माशांच्या भाषेचे मूळ घटक सापडले आहेत," अशी माहिती या अभ्यासाचे सह-लेखक आणि सागरी जीवशास्त्रज्ञ डेव्हिड ग्रुबर यांनी दिली. तर एमआयटी मधील संगणक शास्त्रज्ञ प्रत्युषा शर्मा यांनी सांगितले की, मानवी भाषेप्रमाणेच ठराविक नियमांचे पालन करून हे मासे मर्यादित ध्वनींपासून अमर्याद संदेश तयार करू शकतात.

भौगोलिक अंतरानुसार बदलते भाषा

कॅरिबियन समुद्रातील व्हेल माशांची भाषा जितकी क्लिष्ट आहे, तितकीच भूमध्य समुद्रातील व्हेल माशांची भाषा भौगोलिकदृष्ट्या भिन्न आहे. 'प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, गेली कित्येक दशके शास्त्रज्ञ भूमध्य समुद्रातील सर्व व्हेल माशांची संस्कृती आणि भाषा एकच समजत होते. ते '३+१' (तीन वेगवान क्लिक, एक लहान विराम आणि शेवटचा चौथा क्लिक) या पॅटर्नमध्ये संवाद साधत असत.

मात्र, २००३ ते २०२१ दरम्यानच्या ५,२९१ 'कोडा'च्या विश्लेषणातून समोर आले की, स्पेनच्या जवळ असणाऱ्या पश्चिम भूमध्य समुद्रातील व्हेल मासे अजूनही पारंपारिक '३+१' पद्धत वापरतात. तर ग्रीस जवळील पूर्व भूमध्य समुद्रातील व्हेल मासे याच पॅटर्नची अधिक वेगवान आवृत्ती वापरतात. विशेष म्हणजे, पूर्वेकडील मासे गरजेनुसार पश्चिमेकडील माशांच्या लहेजात बोलतानाही आढळून आले आहेत, ज्याला आपण 'कोड-स्विचिंग' म्हणतो.

Sperm Whale
Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाहून श्रेष्ठ?

सांस्कृतिक वारसा केवळ मानवाचाच नाही!

स्पर्म व्हेलचे आयुष्यमान साधारण ६० वर्षांचे असते, ज्यामुळे त्यांच्या परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे जातात. शास्त्रज्ञांच्या मते, हा भाषिक बदल मानवी भाषेतील बदलासारखाच आहे; जसे इंग्रजीतील 'How do you do?' चे रूपांतर पुढे 'Howdy' मध्ये झाले. टुरसिओप्स असोसिएशनचे जीवशास्त्रज्ञ झेमा ब्रोटॉन्स म्हणतात, "हा शोध आपल्याला आठवण करून देतो की भूमध्य समुद्राचा सांस्कृतिक इतिहास केवळ मानवाचा नाही. येथे हजारो वर्षांपासून मानवी आणि प्राणी संस्कृतीचे सहअस्तित्व आहे."

भाषा की संगीत?

शास्त्रज्ञांनी या ध्वनींचा आकृतीबंध शोधला असला, तरी याला थेट मानवी संभाषणाचा दर्जा देण्याबाबत ते सावध आहेत. १५६ कॅरिबियन कोडांचा नेमका अर्थ काय, हे अजून स्पष्ट झालेले नाही. एक गृहीतक असे आहे की, ही भाषा नसून एका प्रकारचे संगीत असू शकते. संगीताप्रमाणेच या लयींमधून ते विशिष्ट शब्दांऐवजी आपल्या भावना किंवा ओळख व्यक्त करत असावेत.

प्रजातींच्या संरक्षणासाठी होणार फायदा

१९ व्या आणि २० व्या शतकात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील शिकारीमुळे स्पर्म व्हेल आजही धोक्यात आहेत. सध्या त्यांना जहाजांची धडक, मासेमारीची जाळी आणि हवामान बदलाचा सामना करावा लागत आहे. 'प्रोजेक्ट सीईटीआय'चे उद्दिष्ट या भाषेचा वापर करून माशांच्या हालचाली आणि वर्तनाचा अभ्यास करणे हा आहे. जर आपल्याला त्यांच्या धोक्याच्या सूचना समजल्या, तर जहाजांचे मार्ग बदलून त्यांचे प्राण वाचवणे शक्य होईल. तसेच, या सागरी जीवांना स्वतःची संस्कृती आणि भाषा आहे हे सिद्ध झाल्याने, मानवाचा समुद्राकडे आणि पर्यावरण संरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.

Sperm Whale
Success Story: AI ने बदललं नशीब, IIT नसतानाही १९ वर्षांचा तरुण महिन्याला कमावतो तब्बल १ कोटी, कसा उभारला व्यवसाय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news