Artificial Intelligence | कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाहून श्रेष्ठ?

Artificial Intelligence |
Artificial Intelligence | कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाहून श्रेष्ठ?
Published on
Updated on

डॉ. योगेश प्र. जाधव

‘ओपन एआय’चे सॅम आल्टमन आणि जगातील पहिले ट्रिलियनियर एलन मस्क या दोघांनी एआयसंदर्भात केलेल्या भविष्यवाणीमुळे जगभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुढील चार ते पाच वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता कदाचित सर्व मानवांच्या एकत्रित बुद्धिमत्तेच्या मर्यादेला पार करेल. आगामी काही वर्षांतच हे तंत्रज्ञान मानवाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे मोठे वैज्ञानिक शोध लावू शकेल अशा पातळीवर पोहोचेल, असे भाकीत या दोन महारथींनी केले आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक आणि टेस्ला तसेच एक्सएआयसारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क यांनी नुकतीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याविषयी हादरवून टाकणारी भविष्यवाणी केली आहे. मस्क यांनी असा दावा केला आहे की, पुढील अवघ्या चार ते पाच वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता ही जगातील सर्व मानवांच्या एकत्रित बुद्धिमत्तेपेक्षाही अधिक बुद्धिमान आणि सक्षम होईल. मस्क यांच्या या विधानाने जगभरातील वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मस्क हे नेहमीच तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल आपली रोखठोक मते मांडत असतात. ताजी भविष्यवाणी ही त्यांनी प्रसिद्ध व्यावसायिक पीटर एच. डायमंडिस यांच्या एका पोस्टला उत्तर देताना केली आहे. पीटर डायमंडिस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मानवाचे भविष्य केवळ संगणकीय क्षमता आणि ऊर्जेवर अवलंबून नाही. लोकांकडे अशी साधने आणि संसाधने असणे आवश्यक आहे, ज्यांच्या मदतीने ते नवीन कल्पना मांडू शकतील आणि मोठ्या समस्या सोडवू शकतील. डायमंडिस यांच्या या विधानाचा रोख मानवी कल्पकतेकडे आणि मानवाच्या केंद्रीय भूमिकेकडे होता; मात्र याला उत्तर देताना मस्क यांनी स्पष्ट केले की, पुढील चार ते पाच वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता कदाचित सर्व मानवांच्या एकत्रित बुद्धिमत्तेच्या मर्यादेला पार करेल. मस्क यांच्या मते, एआयचा विकास हा रेषीय गतीने होत नसून तो घातांकी गतीने होत आहे. म्हणजेच, दरवर्षी एआयची शिकण्याची आणि विचार करण्याची क्षमता दुपटीने किंवा तिपटीने वाढत आहे. त्यामुळे २०२९ किंवा २०३० पर्यंत एआय मानवापेक्षा कितीतरी पटीने पुढे निघून गेलेली असेल.

एलन मस्क हे जगातील पहिले आणि एकमेव ट्रिलियनियर म्हणजेच खर्वपती आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या विशेषतः एआयच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य अफाट आहे. आज जगभर गाजत असलेल्या चॅटजीपीटीची मूळ पालक कंपनी असलेल्या ‘ओपनएआय’च्या स्थापनेत एलन मस्क यांचा सिंहाचा वाटा होता. २०१५ मध्ये त्यांनी सॅम ऑल्टमन आणि इतर संशोधकांच्या सोबतीने या संस्थेची पायाभरणी केली. त्याकाळी गुगलसारख्या महाकाय कंपन्या एआयवर मक्तेदारी मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. मस्क यांचा उद्देश असा होता की, एआयचा विकास एका बंद खोलीत न होता तो ‘ओपन सोर्स’ असावा, जेणेकरून त्याचे फायदे संपूर्ण मानवजातीला मिळतील आणि कोणतीही एक कंपनी जगावर हुकूमशाही गाजवू शकणार नाही. त्यांनी या संस्थेसाठी सुरुवातीला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला; मात्र पुढे संस्थेच्या व्यावसायिक धोरणांवरून आणि हितसंबंधांच्या संघर्षावरून २०१८ मध्ये त्यांनी ओपनएआयच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला. ही पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या एआयसंदर्भातील वक्तव्यांकडे केवळ शब्दांचे बुडबुडे म्हणून पाहून चालणार नाही.

सध्या ओपनएआय, मेटा, गुगल, अँथ्रोपिक आणि स्वतः मस्क यांची एक्सएआय यांसारख्या महाकाय कंपन्या एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. या महागुंतवणुकीचे प्रमुख कारण म्हणजे, प्रगत संगणकीय पायाभूत सुविधांची उभारणी करणे हे होय. एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटस्‌ आणि अवाढव्य डेटा सेंटर्सची गरज असते. यासाठी अनेक कंपन्या पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. याशिवाय, जगभरातील मजकूर, व्हिडीओ, चित्रे आणि कोडिंगचा डेटा एकत्रित करून एआयला मानवी वर्तनाचा आणि ज्ञानाचा सखोल अभ्यास करून दिला जात आहे. आजच्या एआय सिस्टीम केवळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच क्लिष्ट संगणक कोड लिहिणे, उच्च दर्जाचे साहित्य आणि कलाकृती निर्माण करणे आणि गणितातील अत्यंत कठीण प्रमेये सोडवणे यांसारखी कामे मानवापेक्षा प्रचंड जलद गतीने करत आहेत. या कंपन्यांमधील चुरस इतकी वाढली आहे की, प्रत्येक कंपनी दुसर्‍या कंपनीपेक्षा अधिक वेगवान आणि कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता म्हणजेच एजीआयच्या जवळ जाणारी मॉडेल्स तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. एजीआय म्हणजे अशी बुद्धिमत्ता, जी कोणत्याही क्षेत्रात मानवासारखे किंवा त्याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते.

एलन मस्क यांच्या मते, आगामी काळात केवळ सॉफ्टवेअरच्या पातळीवरच नव्हे, तर भौतिक जगातही एआय मोठी क्रांती घडवून आणेल. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ऑटोमेशन आणि ह्युमनॉईड रोबो म्हणजेच मानवासारखे दिसणारे रोबो बजावतील. मस्क यांच्या टेस्ला कंपनीने विकसित केलेला ऑप्टिमस हा ह्युमनॉईड रोबो याचे उत्तम उदाहरण आहे. भविष्यात एआय आणि या स्मार्ट रोबोचा वापर विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः खाणकाम, रासायनिक कारखाने किंवा अत्यंत उष्ण आणि विषारी वातावरणात मानवाऐवजी हे रोबो काम करू शकतात. यामुळे मानवी जीविताला असलेला धोका कमी होईल. तसेच, उत्पादन क्षेत्रातील पुनरावृत्तीची आणि एकाच प्रकारची कामे रोबो अत्यंत अचूकतेने आणि न थकता चोवीस तास करू शकतील. रोबोच्या वापरामुळे मानवी श्रमावरील खर्च कमी होऊन वस्तूंचे उत्पादन स्वस्त होईल आणि जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. मस्क यांच्या मते, या तंत्रज्ञानाचा वापर योग्य आणि सकारात्मक पद्धतीने केला गेला, तर जगातील गरिबी आणि संसाधनांची कमतरता दूर होऊन मानवासाठी एक समृद्ध आणि सुवर्णकाळ निर्माण होऊ शकतो.

एआयच्या या महाकाय गतीचे जितके फायदे सांगितले जात आहेत, तितकेच किंवा त्याहून अधिक धोकेही आहेत. स्वतः ॲलन मस्क यांनी भूतकाळात अनेकदा एआयच्या अनियंत्रित विकासाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. एआय सर्व मानवांच्या एकत्रित बुद्धिमत्तेपेक्षा अधिक शक्तिशाली झाले, तर मानवाचे त्यावरील नियंत्रण सुटू शकते. या क्रांतीमुळे कारखाने, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आणि सेवा क्षेत्रातील कोट्यवधी नोकर्‍यांवर गदा येण्याची मोठी भीती आहे. यामुळे जागतिक स्तरावर रोजगार संकट उद्‌भवू शकते. त्याचप्रमाणे, एआय यंत्रणेने स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सुरुवात केल्यास ती मानवाचे आदेश नाकारण्याचा धोकादेखील संभवतो. आज एआयमुळे माहितीच्या क्षेत्रात डीपफेक आणि खोट्या माहितीचा प्रसार वाढून सामाजिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. सर्वात महत्त्वाची चिंता म्हणजे, एआय तंत्रज्ञानावर ताबा असणार्‍या मोजक्या कंपन्या किंवा देशांकडे जगाची संपूर्ण संपत्ती एकवटल्यास त्यातून नवे ध्रुवीकरण आकारला येऊ शकते. विकसित देश याचा वापर करून नववसाहतवादी धोरणे राबवू शकतात. एआय प्रणाली मानवी मूल्यांशी सुसंगत नसेल, तर ती मानवाच्या अस्तित्वासाठीच सर्वात मोठा धोका ठरू शकते, हा विचार वैज्ञानिक जगताला चिंतेत टाकणारा आहे.

ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनीही जर्मनीतील ‘डाय वेल्ट’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, २०३० पर्यंत आपल्याकडे मानवालाही अशक्य असणार्‍या गोष्टी करू शकतील अशी एआय मॉडेल्स आली नाहीत, तर मला नक्कीच आश्चर्य वाटेल. एआयच्या प्रगतीचा वेग इतका तीव्र आहे की, आगामी काही वर्षांतच हे तंत्रज्ञान मानवाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे मोठे वैज्ञानिक शोध लावू शकेल, अशा पातळीवर पोहोचेल. एलन मस्क आणि सॅम आल्टमन यांची विधाने आपल्याला एका अत्यंत वेगवान आणि अपरिहार्य भविष्याकडे घेऊन जात आहेत. पुढील चार ते पाच वर्षे ही मानवी इतिहासातील अत्यंत निर्णायक वर्षे ठरणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा स्मार्ट होणार की नाही, यापेक्षा आपण त्या बुद्धिमत्तेचा वापर मानवाच्या कल्याणासाठी कसा करून घेतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा हा भस्मासुर रोखणे आता कोणाच्याही हातात नाही; परंतु योग्य कायदे, आंतरराष्ट्रीय नियमन आणि नैतिक चौकटीच्या माध्यमातून या अथांग शक्तीला योग्य दिशा देणे नक्कीच शक्य आहे. मानवी कल्पकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात स्पर्धा न होता, जर त्यांचा सहप्रवास घडून आला, तरच ते मानवासाठी प्रगतिकारक आणि दिलासादायक ठरेल.

एआय आणि मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीत मूलभूत फरक आहे. मानवाचे आयुष्य मर्यादित आहे. आपल्या कवटीच्या आत असलेल्या काही ग्रॅमच्या मेंदूला मर्यादित ऊर्जेवर काम करावे लागते आणि आपल्याला आपले विचार व्यक्त करण्यासाठी भाषा किंवा बोटांच्या हालचालींवर अवलंबून राहावे लागते. याउलट, एआय सिस्टीम्सकडे अथांग डेटा, अफाट संगणकीय क्षमता आणि अमर्याद वेळ असतो. मानवी मेंदूला अनेक मर्यादा आहेत. म्हणूनच त्याने भाषा, लेखन, शिक्षण आणि विज्ञानाचा शोध लावला, जेणेकरून ज्ञान एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित करता येईल. एआय केवळ डेटाच्या आधारे आकृतिबंध (पॅटर्न) ओळखतो, तर मानव आपल्या मर्यादांमुळे कमीत कमी डेटामधूनही अत्यंत नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील मार्ग शोधून काढतो. पाच वर्षांच्या मानवी बालकामध्ये असणारी नैसर्गिक कल्पकता निर्माण करणे आजही जगातील सर्वात प्रगत एआय मॉडेलला शक्य झालेले नाही. एआय मॉडेल्सची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे ते अत्यंत आत्मविश्वासाने चुकीची माहिती देऊ शकतात. इंटरनेटवरील अथांग माहितीचा आधार घेत असल्याने अनेकदा एआय सिस्टीम्स पूर्वग्रहदूषित, अपूर्ण किंवा खोटी माहिती खरी म्हणून सादर करतात. अशावेळी ‘क्रिटिकल थिंकिंग’ म्हणजेच चिकित्सक विचार करण्याची क्षमता केवळ मानवाकडेच असते. माहितीच्या या महापुरात कोणती गोष्ट खरी, कोणती खोटी आणि कोणत्या माहितीमागे काय उद्देश असू शकतो, हे ओळखण्याचे चातुर्य मानवी बुद्धिमत्तेचे बलस्थान आहे; पण मानवानेच आपली विचार करण्याची क्षमता एआयकडे पूर्णपणे सोपवून दिली, तर भविष्यकाळ कसा असेल, हे सांगण्याची गरज नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news