

पुढारी ऑनलाईन : सोनम वांगचुक यांनी आपला एक जुना व्हिडिओ शेअर करत आपल्यावरही प्रशासनाने पीस बॉण्डवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र, आपण त्यावर स्वाक्षरी केली नाही, असे सांगितले.
जंतर-मंतरवर तिरंगा फडकवल्यानंतर आणि सेंट्रल पार्कमध्ये आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. सीजेपीचे सौरव दास, आशुतोष रांका आणि अभिजीत दीपके या तिघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि पीस बॉण्डवर (शांतता राखण्याचे हमीपत्र) स्वाक्षरी करून घेतल्यानंतर सोडण्यात आले. याच पीस बॉण्डच्या मुद्द्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर त्यांनी लिहिले की, 'प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी तुरुंगात जाणे आवश्यक आहे. गुन्हा केल्याबद्दल नव्हे, तर लोकांच्या कल्याणासाठी.'
...त्यानंतर पुन्हा पीस बॉण्डचा विषय समोर आला नाही
सोनम वांगचुक म्हणाले, 'चार वर्षांपूर्वी माझ्यासमोरही पीस बॉण्ड भरण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते आणि दीर्घकाळ तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मी एक व्हिडिओ तयार केला होता.' यानंतर वांगचुक यांनी तो व्हिडिओ शेअर केला.
व्हिडिओमध्ये काय म्हणत आहेत सोनम वांगचुक?
२७ जानेवारी २०२३ च्या व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक म्हणतात, 'आज जेव्हा मी बेकायदेशीर नजरकैद आणि नायब राज्यपालांच्या मनमानी कारभाराबाबत बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा एका अधिकाऱ्याने माझ्या हातात एक कागद दिला. तो एक बॉण्ड होता. त्यामध्ये मी कोणत्याही सार्वजनिक सभेत सहभागी होणार नाही, भाषण करणार नाही आणि अलीकडील घडामोडींसंदर्भात कोणतीही कृती करणार नाही, असे नमूद करण्यात आले होते. जर मी तसे केले तर...'
वांगचुक पुढे म्हणाले, 'मला भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत मिळालेले माझे अधिकार स्वतःच्या हाताने त्यांच्या स्वाधीन करायचे होते. तसेच ५० हजार रुपयेही भरायचे होते. तेव्हा मी विचारले की, मी पैसे भरले नाहीत तर काय होईल? त्यावर मी म्हणालो की, हे तर सर्वात चांगले होईल. जो माणूस मृत्यूला घाबरला नाही, तो नजरकैदेला कशाला घाबरेल? तुम्ही मला नजरकैदेत ठेवले आहे. येथे अनेक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. उणे १० अंश सेल्सिअस तापमानात अनेक पोलीस कर्मचारी येथे गस्त घालत आहेत. निदान त्यांच्यासाठी एखाद्या तंबूची तरी व्यवस्था करायला हवी होती.'
दरम्यान, नेहा बोरा यांनाही पीस बॉण्डवर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी एसईएम न्यायालयासमोर त्यास स्पष्ट नकार दिला होता.