

Rajnath Singh on Trump Tariff on India
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील आयातशुल्क (टॅरिफ) धोरणांवर थेट हल्ला चढवला. काही जागतिक नेते स्वतःला ‘सगळ्यांचे बॉस’ समजतात, पण भारताच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवले असून, यामुळे 'मेक इन इंडिया' उपक्रमाला खीळ बसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. तरीही, त्यांनी ठामपणे सांगितले की, "भारताच्या प्रगतीला आता कोणीही अडवू शकत नाही.
काही 'बॉस' भारताची वेगाने होत असलेली आर्थिक वाढ सहन करू शकत नाहीत. पण, सगळ्यांचे बॉस तर आपणच आहोत, मग भारत एवढ्या वेगाने कसा प्रगत होतोय?’ असा टोला त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचे स्पष्ट दिसून आले.
अमेरिकेने अलीकडेच भारतीय वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लावले आहे. याशिवाय, रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याच्या कारणावरून भारतावर आणखी 25 टक्के दंडात्मक टॅरिफ लादण्यात आला आहे. ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला “मृत” असे संबोधत, भविष्यात आणखी टॅरिफ वाढविण्याचा इशारा दिला आहे.
सिंह म्हणाले, "काही लोकांना भारताच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीचा त्रास होतो आहे. त्यांची मानसिकता अशी आहे की – ‘सगळ्यांचे बॉस तर आम्ही आहोत, मग भारत एवढा पुढे कसा जातोय?’ आता प्रयत्न असा आहे की भारतात तयार होणाऱ्या वस्तू इतर देशांपेक्षा महागड्या होतील, म्हणजे त्या कोणी विकत घेणार नाही.
काही देशांना भारताच्या यशाचा हेवा वाटतोय. त्यांनी हेतुपुरस्सर अशा उपाययोजना केल्या आहेत की, भारतात तयार होणाऱ्या वस्तू इतर देशांच्या तुलनेत अधिक महाग होतील आणि त्यामुळे जागतिक बाजारात भारताच्या वस्तूंची विक्री कमी होईल."
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट सांगितले की, कोणतीही जागतिक शक्ती भारताला महासत्ता होण्यापासून थांबवू शकत नाही. ते म्हणाले, "ज्या गतीने भारत प्रगती करत आहे, त्यावरून मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो की, "भारत इतक्या वेगाने पुढे जात आहे की आता कोणतीही जागतिक शक्ती भारताला मोठी जागतिक महासत्ता होण्यापासून रोखू शकत नाही."
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताची संरक्षण निर्यात आता 24,000 कोटींच्या पुढे गेली आहे. 2024-25 मध्ये भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन 1.51 लाख कोटी इतके झाले असून, ही मागील वर्षांच्या तुलनेत 18 टक्के वाढ आहे.
ते म्हणाले, "ही आहे नव्या भारताची ताकद. संरक्षण क्षेत्रात आज आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रगती करत आहोत. हेच भारताचं खरे बळ आहे. नव्या भारताचं नवं संरक्षण क्षेत्र सतत प्रगती करत आहे आणि टॅरिफच्या या वादाचा त्यावर काहीही परिणाम झालेला नाही."
या वक्तव्यामुळे भारत- अमेरिका संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव अधिक उघड झाला असून, याचे परिणाम भविष्यातील व्यापारी संबंधांवर होऊ शकतात.
राजनाथ सिंह यांची ही प्रतिक्रिया केवळ एका आर्थिक मुद्द्यावरची नाही, तर भारताच्या जागतिक स्थानाबाबतचा आत्मविश्वास दाखवणारी आहे. अशा वेळी सरकारकडून देशाच्या स्वाभिमानाचा आग्रह आणि स्वयंपूर्णतेवरचा भर अधिकच महत्त्वाचा ठरतो.
राजनाथ सिंह यांनी मध्य प्रदेशातील BRAHMA रेल कोच प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रकल्पातून 5000 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती, उद्योग क्षेत्राचा विकास, आणि रोलिंग स्टॉक (ट्रेन कोचेस) चे निर्यातक्षम उत्पादन होणार आहे.
सिंह म्हणाले, "मध्य प्रदेशचा विकास पाहून मला खात्री आहे की हा राज्य लवकरच 'मॉडर्न प्रदेश' म्हणून ओळखला जाईल. 'ब्रह्मा' नाव ही एक सुंदर संकल्पना आहे – सर्जनशीलतेचा प्रतीक."
BRAHMA प्रकल्पात मेट्रो, वंदे भारत, हाय-स्पीड रेलसाठी कोचेस तयार केले जातील. हा प्रकल्प 148 एकर परिसरात, 1800 कोटींच्या गुंतवणुकीसह, पुढील पाच वर्षांत वार्षिक 1100 कोचेस उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचेल.