

Solapur Fire : सोलापूर येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला रविवारी (दि. १८) पहाटे लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जणांचा होरपळून जागीच अंत झाला. मृतांमध्ये कारखाना मालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह तीन कामगारांचा समावेश होता. या भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टरमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये आगीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना. मृत्यमुखी पडलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल."
सोलापूर येथील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला रविवारी (दि. 18) पहाटे भीषण आग लागली. यामध्ये कारखाना मालक उस्मान हासन मन्सुरी (वय 78), शिफा अनस मन्सुरी (24), युसूफ अनस मन्सुरी (1 वर्ष), अनस हनिफ मन्सुरी (24, सर्व रा. अक्कलकोट रोड, एमआयडीसी कारखाना परिसर), आयेशाबानो महताब बागवान ( 52, रा. गवळी वस्ती, एमआयडीसी), महताब बागवान (51), हिना बागवान (35), सलमान बागवान (18) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.
अक्कलकोट एमआयडीसीमध्ये उस्मान मन्सुरी यांचा टॉवेल कारखाना आहे. या कारखान्यात तयार होणारे टॉवेल परदेशात निर्यात केले जातात. तीन ते चार एकरांत हा कारखाना आहे. दोन मजली इमारत आहे. तीन शिफ्टमध्ये काम चालते. तब्बल 300 ते 400 कामगार या कारखान्यात काम करतात. कारखान्याच्या दुसर्या मजल्यावर मन्सुरी परिवार राहण्यास आहेत. उस्मान हासन मन्सुरी यांचा मुलगा मुंबईत राहतो. तेथूनच निर्यातीचे काम पाहतो. शनिवारी रात्री मालक उस्मान मन्सुरी हे मुंबईहून सोलापुरात आले होते. रात्री झोपल्यानंतर रविवारी पहाटे लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.पहाटे साडेतीन वाजता अचानक आग झागल्याचे समजताच कारखान्यातील सुरक्षा रक्षकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली.
तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. त्याचवेळी एक मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशामक जवानांनी मदत कार्य चालू केले. कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मदतकार्य करण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. उंच शिडीच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जवान आणि अधीक्षक राकेश सांळुखेे आत आग लागलेल्या भागात गेले. तीन कामगारांचे मृतदेह सकाळी बाहेर काढले. तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरींसह इतर सदस्यांचा शाेध घेतला. मोठ्या प्रमाणात आग आणि धुुराचे लोट असल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत होत्या. तब्बल 14 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले.