

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे नुकत्याच पार पडलेल्या 'जेन-झी' (Gen-Z) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्मृती इराणी यांनी मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. "पंतप्रधान ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे त्या पदाला कोणीही शिवीगाळ करू शकत नाही," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आंदोलकांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.
मुलाखतीदरम्यान स्मृती इराणी म्हणाल्या की, "पंतप्रधान हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी एक सर्वोच्च संस्था आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील सुमारे ६४ कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकांनी कोणालाही मत दिले असले, तरी यावरून स्पष्ट होते की देशातील जनतेचा या घटनात्मक व्यवस्थेवर आणि संस्थेवर गाढ विश्वास आहे; आणि म्हणूनच त्यांनी मतदान केले. अशा स्थितीत तुम्ही त्या संस्थेला शिवीगाळ करू शकत नाही, मात्र तरीही दुर्दैवाने तसे करण्यात आले."
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "या विरोधावर संबंधित संस्थेने नेमकी कशी प्रतिक्रिया दिली, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. संस्थेने तुम्हाला कधीही शत्रू मानले नाही, उलट 'हे सोडून पुढे चला' अशीच भूमिका घेतली. काही घटकांना घटनात्मक संस्था आणि देशातील तरुण पिढी यांच्यामध्ये दरी निर्माण करायची आहे. असे असतानाही संस्थेचा दृष्टिकोन सदैव सकारात्मक राहिला आहे. काहीही असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि संस्थेने आपले कर्तव्य चोख बजावले आहे." देशात फूट पाडण्यासाठी आजवर विविध क्लृप्त्यांचा वापर करण्यात आला असून, आधी धर्म, जात आणि प्रदेशाच्या नावावर देशाची विभागणी करण्याचे प्रयत्न झाले आणि आता वयाच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा नवा डाव आखला जात असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना स्मृती इराणी यांनी सांगितले की, पंतप्रधान अखंड देशकार्यात अत्यंत व्यस्त असतात; त्यामुळे ते प्रत्येक शुल्लक विषयावर अथवा टीकेवर प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. युवा विकासाच्या आकडेवारीचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, "गेल्या दोन वर्षांत युवा कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून सुमारे ४ लाख ७४ हजार युवकांना त्यांच्या करिअर विकासासाठी (सीव्ही सुधारण्यासाठी) आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, ही बाब कदाचित अनेकांना ठाऊक नसेल. याच कालावधीत सुमारे ७०० विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांचा थेट संवाद घडवून आणण्यात आला असून, गेल्या दोन वर्षांत तब्बल एक कोटीहून अधिक तरुण थेट पंतप्रधानांशी जोडले गेले आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही."
दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या संदेशाचेही स्मृती इराणी यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रपतींचा हा लेख एक शिक्षिका म्हणून त्यांच्या स्वतःच्या समृद्ध अनुभवांवर तसेच त्यांच्या जीवनातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रभावावर प्रकाश टाकणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. याविषयी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर भावना व्यक्त करताना इराणी म्हणाल्या की, "राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वतः एक शिक्षिका राहिल्या आहेत, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. यंदाच्या शिक्षक दिनानिमित्त त्यांनी एक शिक्षिका म्हणून आपला वैयक्तिक जीवनप्रवास मांडला असून, ज्या शिक्षकांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले आणि ज्या विद्यार्थ्यांकडून त्यांना या काळात मोलाचे शिकायला मिळाले, त्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण त्यांनी या लेखातून केले आहे."