

लखनौ: अयोध्येतील राम मंदिरातील कोट्यवधीच्या देणगी चोरी प्रकरणात एसआयटीने मंगळवारी तपास अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात एफआयआर नोंदवण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस केली आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मंदिराचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, एसआयटीने ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, सदस्य डॉ. अनिल मिश्र, व्यवस्थापक गोपाल राव, व्यवस्थेशी संबंधित रामशंकर यादव टिन्नू यांच्यासह एकूण १४ जणांवर ठपका ठेवला असून, १५० लोकांच्या चौकशीचा तपशील आहे. तपासादरम्यान नोंदवण्यात आलेले अनेक जबाब ट्रस्टकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांशी जुळत नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.
१३ जून रोजी सरकारने ट्रस्टच्या विनंतीवरून लखनौचे विभागीय आयुक्त डॉ. विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती. तिचा अहवाल गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तपास पथकाने सांगितले की, हा २० पानांचा प्राथमिक अहवाल आहे.
अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवणार
सूत्रांनुसार, एसआयटीने गेल्या ५ वर्षांतील देणग्यांचे ऑडिट (लेखापरीक्षण) करण्याची शिफारसही केली आहे. देणगीमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. तसेच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकार हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवणार आहे. यानंतर कोणत्या सदस्यांना पदावर ठेवायचे की हटवायचे याचा निर्णय गृह मंत्रालय घेईल.
१५० जणांच्या चौकशीची माहिती
एसआयटीने सध्या अनुकल्प मिश्र, लवकुश मिश्र, मनीष यादव, राजेश पाठक, रमाशंकर, अविनाश शुक्ल, कृष्णदेव तिवारी, सुभाष श्रीवास्तव यांच्यासह ट्रस्ट आणि बँकेशी संबंधित आरोपीं मिळून एकूण १५० लोकांच्या चौकशीचा तपशील या अहवालात दिला आहे.
दोन कोटींची वसुली
राम मंदिर चोरी प्रकरणात लवकुश, अवनीश, अनुकल्प, करुणे आणि रामशंकर ऊर्फ टिन्नू या ५ आरोपींच्या माहितीवरून दोन कोटी रुपयांची वसुली (रिकव्हरी) झाली आहे. याशिवाय चंपत राय यांचा जवळचा मानल्या जाणाऱ्या टिन्नूच्या घरातून सोने सापडले होते. प्राथमिक अंदाजानुसार, ही चोरी २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
अहवालातील शिफारशी आणि महत्त्वाचे मुद्दे
गेल्या पाच वर्षांतील देणग्यांचे ऑडिट करण्याची शिफारस.
वरिष्ठ अधिकाऱ्याची मंदिराचे सीईओ म्हणून नियुक्ती करा
रोख रकमेच्या चोरीव्यतिरिक्त भक्तांनी दान केलेले काही दागिनेही गायब
देणगी मोजणीशी संबंधित कर्मचाऱ्यांची भरती, देखरेख व्यवस्थेत त्रुटी
ट्रस्टचे काही पदाधिकारी, तसेच बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या भूमिकेवरही प्रश्न
तपास अहवालात देणगी चोरीपासून ते कमिशनखोरीपर्यंतचे पुरावे
झडती न घेता मंदिर कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या येण्या-जाण्यावरही प्रश्न