

Sikkim tunnel landslide
नामची : सिक्किममधील नामची जिल्ह्यात सोमवारी एका निर्माणाधीन बोगद्याबाहेर भीषण दरड कोसळल्याने तब्बल २७ कामगार आत अडकल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत आतापर्यंत ७ कामगारांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृतदेह सिंगतम जिल्हा रुग्णालय, एसटीएनएम रुग्णालय (गंगटोक) आणि नामची जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
ही घटना नामची जिल्ह्यातील समरडुंग, झोलुंगे येथील निर्माणाधीन बोगद्यात घडली. प्रशासनाच्या अंदाजानुसार, आत सुमारे २७ कामगार अडकले असावेत, मात्र या संख्येला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य राबवले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सिक्किम पोलीस, अग्निशामक दल, एनएचपीसीचे अधिकारी आणि आरोग्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. मात्र, बोगद्याच्या आत मिथेन वायूचा प्रादुर्भाव झाल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत. या विषारी वायूच्या संपर्कात आल्यामुळे काही बचावकर्त्यांना भोवळ आली असून काहींची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समरदुंग-मामरिंग बोगद्यात दरड कोसळल्यामुळे बोगद्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे मलब्याखाली गाडला गेला आहे. दरड कोसळताना जमिनीच्या आणि खडकांच्या अंतर्गत हालचालींमुळे मिथेन वायू बाहेर पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बचावकार्यात अडथळे:बोगद्यातील मिथेन वायूचा धोका, अरुंद रस्ता आणि धुरामुळे झालेली धुरकट दृश्यमानता यांमुळे बचाव पथकांना अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलावी लागत आहेत. सध्या सिक्किम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून अडकलेल्या उर्वरित कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.