

अनिल साक्षी
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली आपत्ती अद्याप ओसरलेली नसतानाच पूंछ जिल्ह्यात आणखी एक दरड कोसळण्याच्या घटनेत सातजणांचा मृत्यू झाला आहे. नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) पूंछ जिल्ह्यातील लोरान-दुमिलन परिसरात सोमवारी झालेल्या भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले.
सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती आणि दगड अचानक घसरले. या दरडीखाली अनेक नागरिक अडकले. प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र आणखी काही नागरिक बेपत्ता असल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे.
दरम्यान, अचानक आलेल्या पुराचा आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांना सतर्क करण्यासाठी मशिदींमधून घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिस, नागरी प्रशासन, एसडीआरएफचे जवान आणि स्थानिक स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात केली. प्रशासनाकडून सध्या या दुर्घटनेतील नुकसानीचा अंदाज घेण्यात येत आहे. रस्ते, घरे आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
रविवारीही जम्मू विभागातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा फटका बसला होता. अचानक आलेल्या पुरामुळे पूंछ आणि राजौरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले. या पुरात किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून १० जण अद्याप बेपत्ता आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून सार्वजनिक मालमत्ता, शेती, जनावरे आणि स्थानिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची स्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जम्मू : डोडा जिल्ह्यात सोमवारी रग्गी नाला परिसरात अचानक दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. डोंगरावरून वेगाने खाली आलेले दगड आणि मातीचा मलबा प्रवासी बससह महामार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनांवर कोसळला.
दगड आणि मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने काही वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा आणि माती घसरण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद केली आहे.