पुढारी ऑनलाईन डेस्क : Sikkim Army Vehicle Accident : सिक्कीममध्ये गुरुवारी (दि. 5) एक मोठी दुर्घटना घडली. पाकयोंग जिल्ह्यात लष्कराचे एक वाहन 300 फुट खोल दरीत कोसळले. या अपघातात 4 जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. लष्कराचे वाहन पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील रेशीम मार्गावरील झुलुककडे जात असताना हा अपघात झाला.
लष्कराच्या ताफ्यात तीन वाहनांचा समावेश होता. यातील एका वाहनाचा अपघात झाला. या ताफ्यात 3 सैन्य अधिकारी, 2 जेसीओ आणि 34 सैनिक होते. 3 वाहनांच्या ताफ्यात 1 जिप्सी, 1 ट्रक आणि 1 रुग्णवाहिका होती. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात झालेल्या अपघातात लष्करी जवान शहीद झाल्यामुळे आपण दु:खी आहोत. शोकग्रस्त कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.’
या आधी 2022 मध्ये लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये भीषण अपघात झाला होता. श्योक नदीत लष्कराचे वाहन कोसळून 7 जवानांना प्राण गमवावे लागले होते. तर अनेक जवान जखमी झाले होते. त्या लष्कराच्या वाहनात 26 जवान होते. हे वाहन परतापूरहून उपसेक्टर हनीफकडे जात होते. त्यावेळी वाहन रस्त्यावरून घसरून नदीत कोसळले होते. ज्यात सात जवानांचा मृत्यू झाला होता.