

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आमची वज्रमूठ मजबूत आहे, टायगर अभी जिंदा है, आम्ही शंभर टक्के कुठेच जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चां गुरुवारी सकाळीपासून सुरु झाल्या. त्यानंतर दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी ८ खासदारांसह पत्रकार परिषद घेऊन कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तसेच त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. (Shiv Sena Thackeray Faction)
अरविंद सावंत म्हणाले की, ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकारमध्ये त्रांगडं- गंभीर वाद सुरु आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. अशावेळी या सगळ्यातून दृष्टी दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. यासंबंधी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या गेल्या आहेत. संसदेत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. आत्ताही ९ खासदार सोबत आहेत. आम्ही कुठेही जाणार नाही, टायगर अभी जिंदा है, असे अरविंद सावंत म्हणाले. (Shiv Sena Thackeray Faction)
काही चढउतार झाले तरीही आम्ही पक्षासोबत आहोत. खासदार फुटण्याचा दावा करणाऱ्यांना विचारले पाहिजे की ते कशाच्या आधारे दावा करत आहेत. यासंबंधी कोणाचाही फोन आला नसल्याचे सर्व खासदारांनी सांगितले.
बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे, अमेरिकेने आपल्या माणसांना बेड्या ठोकून देशात पाठवले आहे. अमृतसरमध्ये अमेरिकेचे सैन्यात उतरणे हा देशाचा अपमान आहे. निवडणुकीशिवाय भाजपचे हिंदुत्व काहीही नाही. अमेरिकेने जो देशाचा अपमान केला आहे. त्याचा सरकारला राग आला पाहिजे. यावरुन लक्ष्य हटवण्यासाठी या बातम्या सोडल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी खासदार अनिल देसाई म्हणाले की, कोणाचे महत्व कमी केले जात आहे. या गोष्टी त्यांनी (नरेश म्हस्के) यांनी विचार करावा. लोकसभेतील ९ आणि राज्यसभेतील २ असे सर्व ११ खासदार उद्धव ठाकरे आणि पक्षासोबत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शिवसेना काय आहे सर्वांना माहिती आहे. आम्ही काँग्रेससोबत आहोत. २५ वर्षे आम्ही भाजपसोबत होतो, तेव्हा आम्ही भाजपवासी झालो नाही. तर मग आता काँग्रेसवासी कसे होणार ? काँग्रेसच्या संदर्भात शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. शेखावत आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होताना शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. तसेच मुरली देवरांना महापौर करण्यावेळी देखील पाठिंबा दिला होता, असे अरविंद सावंत म्हणाले.
पत्रकार परिषदेला खासदार अरविंद सावंत यांच्यासह, खासदार अनिल देसाई, संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे आणि नागेश पाटील आष्टीकर हे उपस्थित होते. दरम्यान, संजय दिना पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते, ते संजय राऊत यांच्यासोबत असल्याने इकडे उपस्थित नसल्यासे सांगण्यात आले.