

Shiv Sena Symbol Case
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणी आता २३ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या सुनावणीसाठी १ एप्रिल ही तारीख सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दर्शवण्यात आली होती. मात्र १ एप्रिलच्या पूर्वसंध्येला ही सुनावणी आणखी एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. दीर्घकाळ हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
१२ मार्च रोजी संबंधित प्रकरणासाठी १ एप्रिल ही तारीख दर्शवण्यात आली होती. मात्र आता सुनावणी पुढे ढकलल्यामुळे ठाकरे गटाचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात अंतिम युक्तिवाद बाकी आहे. २३ एप्रिलला सुनावणी झाल्यास शिवसेना ठाकरे गट सर्वप्रथम बाजू मांडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाला युक्तिवादासाठी दीड तासांचा वेळ मिळू शकतो. त्यानंतर शिवसेना शिंदे गट त्यावर आपले मत मांडेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले होते. पक्ष नाव आणि चिन्ह यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात गेली तीन वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन लढाई सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाने जुलै २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पक्ष नाव आणि चिन्हा निर्णयासंदर्भात अंतरिम अर्ज केला होता. यामध्ये महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाला पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावर ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार होती. मात्र ती लांबणीवर पडली. यानंतर ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी १२ नोव्हेंबर २०२५ पासून आम्ही सलग सुनावणी घेवून या प्रकरणाचा निकाल देऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले होते. मात्र यानंतरही सुनावणी पुढे गेली आहे.