Shiv Sena Party Symbol Case : विधिमंडळातील बहुमत म्हणजे पक्षावरील दावा नव्हे! : कपिल सिब्बल

२१ जून २०२२ रोजी मूळ शिवसेनेचे नेतृत्व कोणाकडे होते, हा कळीचा प्रश्न शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद
Shiv Sena Party Symbol Case
Shiv Sena Party Symbol CasePudhari
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : विधिमंडळातील बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे संपूर्ण पक्षावर दावा करता येणार नाही, असा जोरदार प्रतिवाद ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला. शिवसेनेतील बंडाच्या घडामोडींना २० जून २०२२ रोजी रात्री सुरुवात झाली. त्यानंतर २१ जूनला शिंदे गटाच्या आमदारांनी गुवाहाटीत स्वतंत्र बैठक घेऊन ठराव केला. या संपूर्ण घडामोडींच्या वेळी मूळ शिवसेनेचे प्रतिनिधित्व कोण करत होते, हा अपात्रता प्रकरणातील कळीचा प्रश्न असल्याचे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पक्षात मतभेद होते, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर अचानक विरोध कसा निर्माण झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादासह आमदार अपात्रतेच्या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने सिब्बल यांनी प्रतिवाद केला. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती होती. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेसोबतची युती तुटल्याचे कारण देत भाजपने राज्यपालांनी सरकार स्थापनेबाबत केलेली विचारणा नाकारली. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. हे सरकार अल्पकाळ टिकले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मग शिंदे गटाकडून आज ज्या निवडणूकपूर्व युतीचा संदर्भ दिला जात आहे, त्या युतीचा नेमका आधार काय, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.

अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर अचानक विरोध कसा?

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह दादाजी भुसे आणि गुलाबराव पाटील हेही मंत्री होते. राज्यसभा निवडणुकीनंतर आणि २० जून २०२२ रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी रात्री बंडाच्या घडामोडींना सुरुवात झाली. त्याआधी अडीच वर्षे सरकारमध्ये सहभागी असताना पक्षाच्या आघाडीबाबत विरोध किंवा असहमती का व्यक्त करण्यात आली नाही? अचानक विरोध निर्माण झाल्याचा दावा कसा स्वीकारायचा, अशी विचारणाही सिब्बल यांनी केली.

सिब्बल यांनी राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट करताना, निवडून आलेले आमदार हे राजकीय पक्षाच्या अंतर्गत काम करतात, असे सांगितले. विधिमंडळातील बहुमताच्या आधारे राजकीय पक्षाची ओळख ठरवता येणार नाही. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग असून, केवळ संख्याबळाच्या आधारे त्याला मूळ राजकीय पक्षाचा दर्जा देता येणार नाही, असे त्यांनी मांडले. हाच दहाव्या अनुसूचीचा गाभा असल्याचे सांगत, विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मानून निष्कर्ष काढल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदे गटाने भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून पुढे केल्याच्या निर्णयावरही सिब्बल यांनी आक्षेप घेतला. मुख्य प्रतोद नेमण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, विधिमंडळ पक्षातील बहुमताला नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. शिंदे गटातील आमदारांनी गुजरातमार्गे आसाममध्ये मुक्काम केला. २१ जून २०२२ रोजी गुवाहाटीत ३४ आमदारांनी ठराव करून एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदी कायम ठेवण्याचा आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती रद्द करून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा आमदारांच्या गटाचा ठराव होता, महाराष्ट्र विधानसभेचा अधिकृत ठराव नव्हता. राजकीय पक्षाच्या अधिकृत निर्णयाशिवाय विधिमंडळ पक्षातील नेतृत्व आणि मुख्य प्रतोद बदलण्याच्या वैधतेवर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला.

शिंदे गटाकडून राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या पत्राचाही सिब्बल यांनी संदर्भ दिला. या पत्राद्वारे सरकारच्या स्थैर्याला धक्का देण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांचा आरोप होता. पक्षात खरोखर मतभेद असतील, तर ते पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडणे अपेक्षित होते. पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाची मान्यता नसताना पक्षाच्या वतीने पत्रव्यवहार करणे किंवा अन्य आमदारांना नोटिसा बजावणे याला कायदेशीर आधार कसा मिळू शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या निर्णयात शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. त्याआधी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या दोन्ही निर्णयांना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक चिन्ह आदेशातील परिच्छेद १५अंतर्गत होणारी कार्यवाही स्वतंत्र असली, तरी त्यांच्यातील परस्परसंबंध तपासणे आवश्यक असल्याचे सिब्बल यांनी मांडले. निवडणूक आयोगाचा निर्णय नंतरचा असल्याने तो २१ जून २०२२ रोजी मूळ पक्षाचे नेतृत्व कोणाकडे होते, हे ठरवण्यासाठी पूर्वलक्षी पुरावा ठरू शकत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने आता आमदारांच्या अपात्रतेबाबत मूळ दिलासा देता येणार नाही, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे. मात्र, अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या, विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले, त्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित आमदार सदस्य होते. त्यामुळे विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षांच्या निर्णयाची न्यायालयीन तपासणी थांबू शकत नाही, असेही सिब्बल यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरल्यास सर्वोच्च न्यायालय तो रद्द करून प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवू शकते का, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका घेऊन आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी अध्यक्षांच्या निर्णयाची न्यायालयीन तपासणी आणि आवश्यक निर्देश देण्याच्या पर्यायावर भाष्य केले होते. तसेच अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरल्यास निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेली पक्षाची मान्यता आणि धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयावर काय परिणाम होईल, याकडेही लक्ष लागले आहे. या प्रकरणात राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक, पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षांतर यांची व्याख्या तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांची मर्यादा हे मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.