नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या ३ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची तारीख एकाच दिवशी दर्शवण्यात आली आहे. दोन्ही सुनावण्या एकाच दिवशी होणार असल्या तरी दोन्ही सुनावण्या स्वतंत्रपणे होणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणांसह दोन्ही पक्षांच्या नाव आणि चिन्ह प्रकरणांची संभाव्य तारीख देखील न्यायालयाच्या वेळापत्रकात देण्यात आली आहे. यानुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यासंबंधीची सुनावणी १७ सप्टेंबरला तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे यासंबंधीची सुनावणी १२ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena NCP MLA Disqualification Case)
यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण यांची सुनावणी एकाच दिवशी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात दोन्ही सुनावण्यांची संभाव्य तारीख ही ३ सप्टेंबर दाखवण्यात आली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठांसमोर होणार आहे. (Shiv Sena NCP MLA Disqualification Case)
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणी आता १७ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँड मधील आमदार अपात्रता प्रकरण हे दोन्ही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात एकत्र करण्यात आले आहेत. यासंदर्भातील सुनावणी १२ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात या दोन्ही सूनावण्यांसाठी संभाव्य तारीख नमूद करण्यात आली आहे.