Operation Sindoor |
दिल्ली : पाच देशांच्या दौऱ्यावर असलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी मृतांसाठी कोलंबिया सरकारने दिलेल्या शोकसंदेशाबद्दल निराशा व्यक्त केली. दहशतवादी आणि त्यांच्या देशाचे रक्षण करणारे यांच्यात नैतिक समानता असू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
शशी थरूर खासदारांच्या शिष्टमंडळासह कोलंबियामध्ये आहेत. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना मारणारे आणि स्वतःचे रक्षण करणारे यांच्यात कोणतीही समानता असू शकत नाही. कोलंबिया सरकारच्या प्रतिक्रियेमुळे आम्ही थोडे निराश झालो आहोत, दहशतवाद्यांमुळे बळी गेलेल्यांसाठी सहानुभूती दाखवण्याऐवजी भारतीय हल्ल्यांनंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला, असे थरूर यांनी कोलंबियामध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा हात असल्याचे भारताकडे ठोस पुरावे आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ नागरिकांचा बळी घेतला. आम्ही फक्त स्वसंरक्षणाचा आमचा अधिकार वापरत आहोत. परिस्थितीबद्दल कोलंबियाशी सविस्तरपणे बोलण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. कोलंबियाने ज्याप्रमाणे अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, तसेच भारतातही आम्हाला त्रास सहन करावा लागला आहे. जवळजवळ चार दशकांत आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात हल्ले सहन करावे लागले आहेत," असे थरूर म्हणाले.
थरूर यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सर्व संरक्षण उपकरणांपैकी ८१ टक्के चीन पुरवतो. त्यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचाही उल्लेख केला. संरक्षण हा एक सभ्य शब्द आहे, बहुतेक पाकिस्तानी लष्करी उपकरणे संरक्षणासाठी नसून हल्ल्यासाठी आहेत. आमची लढाई आमच्याविरुद्ध दहशत पसरवणाऱ्यांविरुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.