

नवी दिल्ली : 'सर्वांचा आग्रह आहे की महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवारांनी राज्यसभेवर जावे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली आहे. वेळ पडल्यास मी देखील दिल्लीतील काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी बोलेल.' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्याशी याबाबत बोलले आहे, तसेच बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे संसदेच्या एका समितीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘शरद पवारांनी राज्यसभेत जावे यासाठी अनेकांचा आग्रह आहे. एक दोन दिवसात जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे याबाबत शरद पवारांशी बोलतील. आदित्य ठाकरे यांनी काय वक्तव्य केले याची मला माहिती नाही. मात्र चर्चा करायला काहीच हरकत नाही. सहा दशके शरद पवार संसदीय राजकारणात आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांनी राज्यसभेवर यावे, ही इच्छा आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
डीजीसीएने व्हीएसआर कंपनीची चार विमाने ग्राउंड करण्याचा निर्णय घेतला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘यासाठी विमान वाहतूक मंत्रालय आणि रोहित पवार यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील महत्वाची व्यक्ती गेली आहे. हे दुःख ५ कुटुंबातील लोकांचे आहे. ही वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये ही पांडुरंगाकडे प्रार्थना करते. अशा घटना घडत असतील तर तपासणी झाली पाहिजे. रोहित पवार, जय पवार यांनी हा विषय लाऊन धरला. दरम्यान, हवाई सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्याची गोष्ट आहे. विमान वाहतूक मंत्री हे व्यवस्थित तपास करण्याच्या सूचना देतील’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सुप्रीया सुळे पुढे म्हणाल्या की, ‘रोहित पवार यांच्या भावना समजू शकते. आमच्या घरात सगळे अस्वस्थ झाले आहेत. सदर अपघातासंदर्भात संपूर्ण अहवाल येऊद्या, त्रुटी कोणामुळे झाल्या या सगळ्या बाबी समोर येतील. १० दिवसांनी संसद अधिवेशन सुरू होईल. तेव्हा हा मुद्दा उपस्थित करू. अजित पवारांचा अपघात, झारखंड अपघात यावर विमान वाहतूक मंत्र्यांनी सविस्तर चर्चा आणि सरकारचे निवेदन आले पाहिजे.’